कामशेत – रात्रीच्या वेळी तलवार घेऊन हिंडत असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तानाजी शिवाजी शेळके (वय 22 ,) व किरण पांडुरंग आतकर ( वय 21 , दोघे रा. करंजगाव ता. मावळ ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास कामशेत येथील छत्रपती शिवाजी चौकातून दुचाकी वरून जाणाऱ्या दोन युवकांना रात्र गस्त घालणाऱ्या पोलिसांनी थांबून त्यांची चौकशी केली असता त्यांच्या जवळ लोखंडी तलवार सापडल्याने पोलिसांनी त्यांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलीस उपनिरीक्षक बी.बी. पाटील, पोलीस नाईक रामचंद्र कानगुडे, चालक संतोष दोरके हे बुधवारी रात्रीपासून कामशेत शहरात रात्र गस्तीवर असताना कामशेत रेल्वे स्थानकाकडून गुरुवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोन युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली अणि त्यांच्या ताब्यातील दुचाकीची झडती घेतली असता दुचाकीच्या सीट लगत एक लोखंडी तलवार मिळून आली. पुढील तपास उपनिरीक्षक बी.बी. पाटील करत आहेत.