विद्यार्थ्यांच्या सहल बसला झाला अपघात

 संगमनेर – तालुक्‍यातील धांदरफळ खुर्द येथील बी. जे. खताळ माध्यमिक विद्यालयाच्या दोन बस कोकणातील अलिगड येथे सहलीसाठी गेल्या होत्या. त्यातील एका बसला पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेनजीकच्या सोमाठणे फाट्याजवळ आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघात बसचालकासह नऊ विद्यार्थी, मुख्याध्यापक व एक शिक्षक जखमी झाले आहेत.

या सर्वांवर तळेगाव दाभाडेतील पवना रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेकडे धाव घेतली, तर काहींनी थेट तळेगाव दाभाडे गाठले. याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, तालुक्‍यातील धांदरफळ खुर्द येथील बी. जे. खताळ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीतील 91 विद्यार्थ्यांची सहल राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसमधून अलिगड येथे गेली होती.

दिवसभर अलिगड, मुरुड-जंजिरा आदी पर्यटनस्थळांना भेटी दिल्यानंतर परतीच्या प्रवासात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्या सर्वांनी पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले. साधारण तीन ते साडेतीनच्या दरम्यान एका ठिकाणी चहा पिण्यासाठी ते थांबले होते. त्यानतंर जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने बसमधून (क्र. एमएच-14 बीटी 4128) एकूण 44 विद्यार्थी संगमनेर च्या दिशेने निघाले. त्यांची बस तळेगाव दाभाडेनजीकच्या सोमाठणे फाट्याजवळ आली असता, चुकीच्या दिशेने एक मालट्रक सरळ बसच्या दिशेने येत असल्याचे बसचालक नईम रफीक शेख यांना दिसले.

मात्र समोरुन येणाऱ्या ट्रकचा व बसचा वेग अधिक होता. त्याचवेळी रस्त्याच्या मधोमध बंद अवस्थेत उसाने भरलेली ट्रॅक्‍टर ट्रॉली चालकाला दिसली. त्यामुळे चालकाने या ट्रॉलीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय बसमधील 44 विद्यार्थ्यांसह शिक्षकांना जीवदान देणारा ठरला. बसने ट्रॉलीला समोरुन धडक मारल्याने यात चालक शेख स्वतःही जखमी झाले. या अपघाताने अर्धवट झोपेत असलेले विद्यार्थी एकमेकांवर आदळले.

काहींना दुखापत झाली, तर काही विद्यार्थी फ्रॅक्‍चर झाले. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीसही घटनास्थळी हजर झाले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीने नजीकच्या पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात चैताली संजय घुले, शिवाजी रामहरी शेटे, अनिकेत दत्तात्रय घुले, किरण सुखदेव कोकणे, प्राची अशोक गुंजाळ, साक्षी अरुण कोकणे, कार्तिकी शांताराम खताळ, दीपाली भालचंद्र गोडसे या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक चॉंदसाब अत्तार, शिक्षक सखाराम पांडुरंग भालेराव व बसचालक नईम रफीक शेख हे जखमी झाले आहेत. नानासाहेब बर्डे व निकिता खताळ या दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

पालकांची शाळेत गर्दी
या घटनेचे वृत्त समजताच अनेकांनी दूरध्वनी वरुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पाल्याच्या काळजीने काही पालकांनी तळेगाव दाभाडे जवळ केले, तर अनेकांनी सकाळीच धांदरफळच्या शाळेत गर्दी केली होती. पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे यांचे पती दत्तात्रय कोकणे सकाळीच तळेगाव दाभाडेला पोहचून सर्वांना मदत केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य रामहरी कातोरे हे दिखील रुग्णालयात गेले व जखमींची भेट घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.