‘काळ आला होता पण वेळ नाही’

मंचर येथे पुणे-नाशिक महामार्गावर एसटीचा अपघात टळला, छातीत कळ आल्यानंतरही बस आणली नियंत्रणात 

मंचर – येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या संगमनेर-पुणे एसटी गाडीच्या चालकाला अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याने त्रास होऊ लागला. चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवित एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी केल्याने एसटी बसमध्ये असणाऱ्या सुमारे 50 प्रवाशांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. एसटी चालकाला वैद्यकीय उपचारासाठी चाकण येथील खासगी दवाखान्यात नेले. ही घटना पुणे-नाशिक रस्त्यावरील मंचर शहरातील नक्षत्र रेसिडन्सीनजीक रविवारी (दि. 8) दुपारी 4 वाजता घडली.

बसचालक मनोहर गादरे (वय 40, रा. साकुर मांडवे, ता. संगमनेर) असे या चालकाचे नाव आहे. संगमनेर आगाराची संगमनेर-पुणे एसटी बस (एमएच 40 वाय 5992) पुण्याच्या दिशेला ते घेऊन जात होते. बसमध्ये 50 प्रवासी होते. वाहक गणेश खरमाळे हे प्रवाशांना तिकीट देत होते. उद्योजक अजय घुले यांच्या नक्षत्र रेसिडन्सीनजीक एसटी चालक मनोहर गादरे यांना छातीमध्ये कळ आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटु लागले.

मंचर, यवत, बेल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 54 जणांचे प्राण वाचले

बसमधील प्रवाशांमध्ये घबराट झाली. प्रसंगावधान राखत मनोहर गादरे यांनी ताबा मिळवत एसटीबस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यावेळी गादरे हे अत्यवस्थ झाले. तातडीने प्रवासी आणि एसटीचे वाहक गणेश खरमाळे यांनी त्यांना मंचर येथील खासगी दवाखान्यात अमित काटे यांच्या रुग्णवाहिकेतून नेले. तेथे डॉ. आशिष पोखरकर यांनी वैद्यकीय तपासणी केली.

पुढील वैद्यकीय उपचारासाठी चाकण येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले आहे, अशी माहिती मंचर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एस. एन. चिंचपुरे आणि एन. एस. सय्यद यांनी दिली. राजगुरुनगर एसटी आगाराचे सहायक आगारप्रमुख महेश विटे यांनी मंचर बसस्थानक येथे भेट देऊन घाबरलेल्या प्रवाशांना दिलासा दिला. तसेच त्यांना पुढील प्रवासासाठी इतर एसटी बसमध्ये बसवून दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.