बारावी नापास मंत्र्यांला राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यावर बोलण्याचा अधिकार नाही 

– नवाब मलिकांचे शिक्षण मंत्र्यांना प्रत्युत्तर

मुंबई  – शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जाहिरनाम्यावरील टिकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जो माणूस बारावी पास नाही, ज्या माणसाला कागद वाचता येत नाही त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत मलिक यांनी तावडेंच्या टिकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर बुधवारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा मसुदा रद्द करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. हे आश्वासन म्हणजे मुस्लीम समाजातील महिलांना पुन्हा अंधाराच्या खाईत ढकलण्याचे कृत्य आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यावर गप्प का आहेत, असा सवाल तावडेंनी केला होता. जाहीरनाम्यातील माहिती आणि आश्वासने अतिशय विसंगत स्वरुपाची असून हा जाहीरनामा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कर्मचाऱ्याने तयार केला की, राष्ट्रवादीच्या नेत्याने, हा संशोधनाचा विषय आहे असा टोलाही तावडे यांनी लगावला होता.

तावडेंच्या टिकेला प्रत्युत्तर देताना नवाब मलिक म्हणाले, शिक्षण मंत्री तावडे हे 12 वी नापास आहेत. त्यांची डिग्रीसुध्दा फेल आहे. त्यामुळे त्यांना कागद वाचता येत नाही हे सिध्द केले म्हणूनच जाहिरनाम्यावर टिप्पणी करत आहे, असा टोला लगावतानाच तावडेंनी 12 उत्तीर्ण दाखला दाखवावा व नंतर जाहीरनाम्यावर टिका करावी, असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.