स्थायी समिती : आम्ही चर्चा कोणाशी करायची?
प्रस्ताव मंजुरीस नकार
आयुक्तांच्या अनुपस्थितीवरून सदस्य नाराज असतानाच; काही अधिकाऱ्यांनी प्रशासनाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवले. मात्र, संतापलेल्या सदस्यांनी प्रशासनाचे प्रस्तावच घेण्यास नकार दिला. आयुक्त उपस्थित असल्याशिवाय, प्रशासनाच्या एकाही प्रस्तावाला मान्यता देऊ नये अशी मागणी समिती अध्यक्षांकडे करण्यात आली. समिती अध्यक्षांनीही हे प्रस्ताव दाखल करून घेण्याच्या सूचना केल्या.
पुणे – महापालिका आयुक्त सौरभ राव वारंवार स्थायी समितीच्या बैठकांना दांडी मारत असल्याने मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत त्यांच्या अनुपस्थितीबाबत सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सदस्यांना वेगवेगळया विषयांवर चर्चा करायची असते मात्र, आयुक्त येत नसल्याने चर्चा होत नाहीत तसेच अधिकारी योग्य उत्तरे देत नाहीत त्यामुळे भाजपच्या सदस्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. तसेच आयुक्त आल्या शिवाय, प्रशासनाचा एकही प्रस्ताव मंजूर करणार नाही, अशी भूमिकाही बैठकीत घेण्यात आली.
गेल्या काही बैठकांना महापालिका आयुक्त स्थायी समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. मुंबईत बैठका अथवा घरगुती कामानिमित्ताने रजेवर असल्याने ते बैठकांना उपस्थित नसल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत सांगण्यात येत आहे. मात्र, आयुक्त नसल्यास अधिकाऱ्यांक़डून योग्य पद्धतीने उत्तरे मिळत नाहीत, काही माहिती हवी असल्यास आयुक्तांशी चर्चा करायची असते.
मात्र, आयुक्तच बैठकांना येत नाहीत. त्यामुळे आम्ही चर्चा कोणाशी करायची? असा सवाल सत्ताधारी भाजपच्या समिती सदस्यांनी केला. त्यानंतर उपस्थित असलेल्या कोणीही अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत उत्तर दिले नाही. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी “आयुक्त मुंबईला गेले असून आपल्याला कल्पना दिली’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदस्यांचे समाधान झाले नाही.