सभापतिपदी शितोळे, उपसभापतिपदी दोरगे
वरवंड (वार्ताहर) – दौंड पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याने सभापती आणि उपसभापतिपदाची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट होते. त्यानुसार आशा नितीन शितोळे व नितीन दोरगे यांची अनुक्रमे सभापती, उपसभापतिपदाची माळ गळ्यात पडली आहे. या निवडीनंतर दौंड पंचायत समिती कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला .
दौंड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे. दौंड पंचायत समितीतील 12 पैकी 11 राष्ट्रवादीचे तर भाजप-रासप युतीचा एक सदस्य आहे. मंगळवारी (दि. 31) औपचारिकता म्हणून पंचायत समिती कार्यालयात सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सभापतिपदासाठी आशा शितोळे तर उपसभापतिपदासाठी नितीन दोरगे यांचा एकमेव अर्ज दाखल झल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली नागवडे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप हंडाळ, योगेंद्र शितोळे, सत्वशील शितोळे, शिवाजी ढमाले, प्रशांत शितोळे, नितीन शितोळे, राहुल आव्हाड, सागर शितोळे पाटील यांसह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
शरद पवार यांनी महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मी आज तालुक्याच्या सभापतिपदी विराजमान झाली आहे. इथून पुढील काळात दौंड तालुका कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करणार आहे.
– आशा शितोळे, नवनिर्वाचित सभापती, पंचायत समिती, दौंड