लॉकडाऊनमध्ये 93 वर्षीय आजीबाई 40 वर्षांनी घरी परत

भोपाळ – सुमारे 40 वर्षांपूर्वी पंचुबाई नावाच्या एक महिला मध्यप्रदेशातील एका लहानशा खेडेगावात अपघातानेच पोहोचल्या होत्या. मधमाशांनी हल्ला केल्यामुळे त्या स्वतःला वाचवण्यासाठी फिरत होत्या. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना आसरा दिला होता. त्यावेळी पंचुभाईंचे वय होते 53 वर्षे. पण त्यावेळी अपघाताने अनोळखी गावात पोहोचलेल्या या महिलेला आपल्या घरी जाता आले नाही, कारण त्यांना स्थानिक लोकांची भाषाच येत नव्हती. त्यांना केवळ मराठीच येत असल्याने त्या संवाद साधू शकल्या नाहीत.

अखेर गावकऱ्यांच्या बरोबरच त्या राहू लागल्या आणि गावकऱ्यांनी त्यांना आपल्यातच सामावून घेतले. मात्र आता लॉकडाऊनमध्येच या महिलेला आपल्या घरचा पत्ता मिळाला आणि त्या आपल्या घरी रवाना झाला. 40 वर्षे ज्या गावकऱ्यांनी पंचुबाईंना सांभाळले, त्यांनी साश्रु नयनांनी या 93 वर्षांच्या आजीबाईंना निरोप दिला.

मध्यप्रदेशातील दामोह जिल्ह्यातील कोटा ताला गावातील या गावकऱ्यांसाठी पंचुबाई या गावच्या मौसी (मावशी) होत्या. आता त्या आपल्या मूळ गावी म्हणजे नागपूरला रवाना झाल्या आहेत. त्यांचा नातू पृथ्वीकुमार सिंगल त्यांना नेण्यासाठी आले होते.

पंचुबाईंना 40 वर्षांपूर्वी नूर खान नावाच्या व्यक्‍तीने वाचवले होते. त्यावेळी पंचुबाई मराठीत काही तरी बडबडत होत्या. नूर खान यांनी त्यांना आपल्या घरी नेले आणि आपल्याच घरात त्यांना आश्रय दिला. नूर खान यांचे 2007 साली निधन झाले. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी पंचुबाईंची साथ सोडली नाही.

लॉकडाऊन दरम्यान नूर खान यांचे पुत्र इसरार यांनी 3 मे रोजी पंचुबाईंना त्यांच्या इतिहासाबद्दल विचारले. त्यावेळी “खाजनामा’ “पथरोत’ असे काहीसे त्या पुटपुटल्या. इसरार यांनी हे दोन्ही शब्द गुगलवर टाईप केले आणि “पथरोत’ या गावच्या गावकऱ्यांशी संपर्क साधला. इसरार यांनी पंचुबाईंचा फोटो व्हॉट्‌सऍपवरून पाठवला आणि काही तासांच्या आत त्यांच्या कुटुंबीयांशीही थेट संपर्क झाला.

पंचुबाईंच्या घरच्यांनी त्यांना ओळखले आणि त्यांना घरी नेण्यासाठी थेट मध्यप्रदेशातील कोटा ताला गाव गाठले. त्याला आपली आजी इतके दिवस जिवंत असल्यावर विश्‍वासच बसला नाही. पंचुबाईंना उपचारासाठी नागपूरला नेले जात असताना वाटेत बेपत्ता झाल्या होत्या. त्यावेळी पृथ्वीकुमार सिंगल यांचा जन्मही झाला नव्हता. आता कोटा तालाच्या गावकऱ्यांना त्यांच्या लाडक्‍या मौसीला सोडणे अवघड बनले होते. पंचुबाईंनाही 40 वर्षांचा सहवास सोडणे अवघड बनले होते. अखेर डोळ्यात पाणी घेऊन त्या आपल्या नातवासोबत आपल्या जुन्या घरी नव्याने रवाना झाल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.