पाषाण येथे दरोडा; केअरटेकरला काठी, कोयत्याने मारहाण
पुणे – पाषाण येथील पंचवटी सोसायटीत दरोडा टाकून सव्वाचार लाखांचा ऐवज लुटण्यात आला. घरातील ज्येष्ठ महिलेचे हात बांधून तिच्या तोंडात कापडाचा गोळा घालण्यात आला. तर केअर टेकरला काठी आणि कोयत्याने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 80 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी ज्येष्ठ महिलेचा पाषाण येथे पंचवटी नावाचा बंगला आहे. तिचे पती माजी वकिल असून पॅरालिसिस झाल्याने झोपूनच असतात. तिचा एक मुलगा अमेरिकेला, तर दोन विवाहित मुली पुण्यातच रहातात. त्यांच्या देखरेखीसाठी एक केअर टेकर ठेवण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चार व्यक्ती कोयता, सुरा आणि काठी घेऊन घरात घुसले. त्यांनी केअर टेकरच्या पायावर काठीने व कोयत्याने मारुन जखमी केले. यानंतर केअर टेकर व फिर्यादी यांचे हात व तोंड कापडाने बांधून घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरवून किंमती ऐवज शोधण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या मजल्यावरील बेडरुमच्या कपाटाचे दरवाजे उचकटून रोख 25 हजार व सोन्याचे दागिने असा 4 लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करत आहेत.