सिंहगड रोड – इच्छाशक्ती आणि आध्यत्मिकतेच्या जोरावर धायरी येथील ठकूबाई नारायण बेनकर (वय 80) यांनी तब्बल 35 दिवस लढा देत करोनावर मात केली आहे. या आजींना रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज मिळाला. ठकूबाई या घरी सुखरूप आणि करोनामुक्त होऊन परतताच कुटुंबीयांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
ठकूबाई बेनकर यांना काही दिवसांपूर्वी खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्वरित त्यांची करोना चाचणी करून घेतली त्यात त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कर्वे रस्त्यावरील संजीवन रुग्णालयात 15 एप्रिल रोजी दाखल केले होते.
बेनकर यांना रक्तदाब आणि मधुमेह आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.
तेथे तब्बल 18 दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. नंतर आठ दिवस कोविड वॉर्ड येथे उपचार घेत असताना करोना संसर्ग आटोक्यात आला होता.
पुढे जनरल वार्डमधील नऊ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णालयात उपचार घेत असताना ठकूबाई यांनी सकारात्मक विचार करत आध्यत्मिकता जपली. त्यामुळे त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली. त्या धायरी गावच्या माजी सरपंच आशा सुनील बेनकर यांच्या सासू आहेत.
विठ्ठलाची कृपा असल्यामुळे या महाभयंकर करोना संसर्गातून मुक्तता झाली. रुग्णालयात उपचार घेत असताना सातत्याने मी विठ्ठलाचा जप करत होती. तसेच माझ्या परिवाराने देखील वेळोवेळो सकारात्मक विचार करण्यास सांगितले या सर्व गोष्टींमुळे मी करोनाला हरवू शकले.
– ठकूबाई बेनकर, धायरी गाव.