मतमोजणीसाठी नियुक्त केलेले 1200 कर्मचारी सोलापूर मुक्कामी

स्ट्रॉंग रूम उघडणार सकाळी 6 वाजता

सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर व माढा मतदारसंघातील निकालास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असल्याने उत्सुकता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. आज रामवाडी गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सोलापूर शहराच्या बाहेरील 1200 कर्मचाऱ्यांची शहरामध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज पहाटे पाच वाजताच सर्व कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालण्याची शक्‍यता गृहित धरून आवश्‍यक त्या सर्व सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केल्या आहेत.

मतमोजणीच्या तयारीची मंगळवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पाहणी केली. व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये, याची दक्षता घेण्यात आली आहे. गोदामाच्या आतील बाजूस प्रत्येकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांना आतमध्ये येण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आहेत. सकाळी सहा वाजताच मतमोजणीची तयारी सुरू करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना मुक्कामी बोलाविण्यात आले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणीवेळी गोदाम परिसरात मोबाईल बंदी ठेवली आहे. यातून पत्रकारांना सवलत देण्यात आली असून मीडिया कक्षापर्यंतच मोबाइल नेता येणार आहे. इतर ठिकाणी मोबाइलचा वापर केल्यास मोबाईल जप्त करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

72 लॅपटॉप, 24 प्रिंटर
मतमोजणीची फेरीनिहाय माहिती आयोगास कळविण्यासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. यासाठी 72 लॅपटॉप व 24 प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 12 लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फेरीनिहाय मतांची आकडेवारी आयोगाच्या सुविधा संकेतस्थळावर भरणे, आयोगास पाठविण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे. विद्युतपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरचीही सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here