मुंबई – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टापलचेसमध्ये रजत पदक मिळवल्याचा आनंद तर आहेच, परंतु धावताना मी थोडा संथ झालो व त्यामुळेच माझे सुवर्णपदक हुकले, अशी खंत भारताचा अव्वल धावपटू अविनाश साबळे याने व्यक्त केली.
बर्मिंगहॅमला झालेल्या या स्पर्धेत अविनाशला केवळ काही सेकंदांच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली, त्यावर बोलताना साबळेने आपले मत मांडले.
केनियाचे धावपटू कडवी लढत देत होते. अंतिम रेषा पार करण्यापूर्वी माझ्या धावण्यात थोडा संथपणा आला व त्याचा फटका बसला, अन्यथा मला सुवर्णपदक निश्चितच मिळाले असते, असेही त्याने सांगितले.
दरम्यान, साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत 8:11:20 अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. मागील सहा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिन्ही पदके ही केवळ केनियन खेळाडू जिंकत होते. 24 वर्षात प्रथमच केनियाशिवाय अन्य देशाने स्टीपलचेसमध्ये पदक जिंकले. अविनाशने हे रौप्य पदक जिंकत त्यांच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.