तरुणीच्या खूनप्रकरणाचा सस्पेन्स कायम

“त्या’ रात्री नेमके काय झाले; कारण अजूनही गुलदस्त्यात

पुणे – माणिकबाग येथे एमबीए झालेली तरुणी तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. ससून रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालानंतर मंगळवारी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी सिंहगड रोड पोलिसांनी एका तरुणीसह दोघा तरुणांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांच्या उत्तरांत विसंगती आढळून येत असल्याने खुनाचे कारण गुलदस्त्यात आहे. तर, दुसरीकडे घटनेनंतर आरोपी तब्बल 15 तास मृतदेहासोबत असल्याची माहिती उघड झाली आहे.

तेजसा श्‍यामराव पायाळ (वय, 29 वर्षे रा. फ्लॅट नं. 15) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.2) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी तरुणीच्या शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पियुष संचेती (34, रा. तुळशीबागवाले कॉलनी), वसंतकुमार गौडा (31, रा. बंगळुरू), सोनल सुनील सदरे (29, रा. आंबेगाव, मूळ नगर) यांना अटक करण्यात आली.

पबमध्ये झाली होती मैत्री
पियुष संचेती याचा मिनरल वॉटर पुरवठ्याचा व्यवसाय आहे. तर मृत तेजसा आणि सोनल या नोकरीच्या शोधात होत्या. या सर्वांची पबमध्ये ओळख झाली होती. यानंतर त्यांनी अनेकदा पार्ट्या केल्या होत्या. तर वसंतकुमार हा पियुषचा मित्र आहे. तो बंगळुरूहून पुण्यात एका नातेवाईकाच्या विवाहासाठी आला होता. घटनेच्या दिवशी पियुषने त्याला आणि सोनलला तेजसा हिच्या घरी पार्टीसाठी बोलवले होते. पार्टीमध्ये असा काय वाद झाला, की तेजसा हिचा खून करण्यात आला हे अजूनही पोलिसांना कळालेले नाही. संशयितांच्या जबाबात विसंगती आढळून येत असल्याने पोलीस अजून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.