नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या जवळपास दोन कोटींपर्यंत पोहोचत आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र संख्या काही केल्या कमी होत नाही. याच दरम्यान भाजपाच्या एका आमदाराने कोरोना बरा होण्यासाठी एक अजब दावा केला आहे. “रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही” असे वादग्रस्त विधान केले आहे.
भाजपाचे बुलंदशहचे आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी गोमूत्र प्यायल्याने कॅन्सर आणि कोरोनासारखे आजार होणार नाहीत असा दावा केला आहे. गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे देखील म्हटले आहे. देवेंद्र सिंह लोधी यांनी रोज 25 एमएल गोमूत्र प्यायल्याने सर्व आजार पळून जातात असे म्हटले आहे. तसेच लिव्हर, किडनी यांनाही खराब होऊ देत नाही असे म्हटले आहे. लोधी यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. उत्तराखंडचे भाजपा आमदार महेंद्र भट्ट यांनीदेखील उपाशी पोटी गोमूत्रचे सेवन केल्यास कोरोनाचा खात्मा होईल असा दावा केला होता.
देवेंद्र सिंह यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपा नेते राजीव शुक्ला यांनी जोरदार टीका केली आहे. “हे सर्व अद्यापही सुरू आहे. कोर्टाने यांना शांत राहण्यास सांगितलं पाहिजे. अशा विधानांमुळे लोकांमधील रोष वाढतो. भाजपा आमदारांना अशा विधानांची आता सवय झाली आहे. कोणीही गोमूत्रच्या विरोधात नाही. पण डॉक्ट असल्याप्रमाणे कोरोनावरील इलाज सांगून गोमातेला यामध्ये आणू नये” असे म्हटले आहे.
जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना अनेक देशांमध्ये वेगाने लसीकरण देखील सुरू आहे. याच दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेने मॉडर्नाच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे.