पुणे – एकीकडे करोनाच्या रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर दुसरीकडे नागरिकांचा करोना प्रतिबंधक नियमांचा विसर पडल्याचे चित्र शहरात असून, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आणि बसथांबे देखील याला अपवाद नाहीत.
मागील वर्षी करोनाचा प्रसार होवू लागल्यानंतर सार्वजनिक वाहतूक बंद होती. त्यानंतर अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू केली. पहिल्या टप्प्यात वाहतूक यंत्रणांनी देखील बॅरिकेडिंग, मास्क नसल्यास कारवाई, प्रवाशांच्या तापमानाची चाचणी आदी उपाययोजना केल्या. मात्र कालांतराने त्याचा विसर पडला. सध्या स्थानकांवर कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
एसटी बसस्थानक
स्वारगेट, वाकडेवाडी, पुणे स्टेशन या तिन्ही प्रमुख एसटी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यापैकी बहुतांश नागरिक मास्क न वापरताच स्थानकाच्या आवारात फिरत आहेत. इतकेच नव्हे तर, नागरिकांकडून “सोयीस्कर’पणे मास्क गळ्यात अडकवण्याला प्राधान्य दिले जात आहे. याशिवाय एसटीचे कर्मचारी, वाहक आणि चालकदेखील मास्क वापर टाळत असून, बहुतांश चालक-वाहक प्रवाशांना मास्क लावला नसण्याबाबत विचारणा करत नाहीत.
रेल्वे स्टेशन
रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर येण्यास वेळेचे निर्बंध आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी स्थानक आवारात बसतात. त्यातील अनेक विनामास्क घोळक्याने बसतात. यापूर्वी स्थानक आवारात बॅरिकेडिंग होते, एन्ट्री गेट बंद केले होते. मात्र आता अनेक नियम शिथिल केल्याने प्रवासी सर्रास विनामास्क फिरत असल्याचे येथे दिसून येते.
रेल्वे स्थानक आवारात कर्मचारी प्रवाशांना मास्क वापरण्याच्या सूचना देत आहेत. आरक्षणाचा संदेश, तिकीट, उद्घोषणा आदी माध्यमांसह गाड्यांमध्ये मास्कबाबत प्रबोधन आणि कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील जबाबदारी ओळखून नियमांचे पालन केले पाहिजे.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग
स्वारगेट येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. स्थानकाच्या आवारात नागरिकांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. गाड्यांचे देखील निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
– सचिन शिंदे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट एसटी बसस्थानक