ती वेळ यावी लागते

आचार्य विनोबा भावे यांचे सर्वच साहित्य वाचनीय आणि मननीय आहे. त्यांची “गीता प्रवचने’ आणि “मधुकर’ ही माझी ावडती पुस्तके. गीता प्रवचने या पुस्तकाचा जन्म 1932 साली धुळ्याच्या तुरुंगात जाला. तेथे विनोबांनी कैद्यांपुढे दर रविवारी एक अशी 18 अध्यायांवर 18 प्रवचने दिली. पाठीमागे बसून साने गुरुजींनी ती प्रवचने ऐकली आणि शब्दबद्ध केली. तेव्हा म्हणजे 1932 साली साने गुरुजी धुळ्याच्या तुरुंगात राजकैदी म्हणून शिक्षा भोगत होते. त्यांच्याबरोबर त्यावेली जमनालाल बजाज, आपटे गुरुजी हेही महानुभाव तेथे शिक्षा भोगत होते.

साने गुरुजींनी शब्दबद्ध केलेल्या प्रवचनांचे पुढे “गीता प्रवचने’ या शीर्षकांचे पुस्तक निघाले. ते घराघरांत पोहोचले. सर्व त्यांचे स्वागत झाले. साध्या सोप्या भाषेत विनोबांनी गीतेचे मर्म उलगडून दाखविले. या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या.

विनोबांनी ज्या जागेवर कैद्यांपुढे प्रवचने दिली त्या जागेला भेट द्यावी, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हावे अशी माजी इच्छा होती. कारण माझ्या दृष्टीने ते तीर्थक्षेत्र होते. कृष्णाचा जन्म बंदीखान्यात झाला आणि “गीता प्रवचने’ पुस्तकाची निर्मितीही बंदीखान्यातच झाली. म्हणून ती जागा डोळे भरून पहावी अशी माझी इच्छा होती; पण ती वेळ जुळून येत नव्हती.
2007 साली “गीता प्रवचने’ या पुस्तकाच्या निर्मितीला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून साने गुरुजी कथामालेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांनी धुळ्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून दीडशे कार्यकर्ते आले होते. कार्यक्रमाचे स्वरूप असे होते की, प्रथम गीता प्रवचने या ग्रंथाचे पूजन करायचे. नंतर पालखीत तो ग्रंथ ठेवून त्याची ग्रंथदिंडी काढायची. ही शोभायात्रा धुळ्याच्या जेलपर्यंत न्यायची. नंतर प्रत्यक्ष जेथे विनोबांनी गीतेवर प्रवचने दिली, त्या जागेला भेट देऊन दर्शन घ्यायचे.

या कार्यक्रमात मीही सामील झालो होतो. ग्रंथदिंडी समाप्त झाल्यावर कार्यकर्ते जेलमध्ये ओळीने जाऊ लागले. मात्र तेथे मर्यादित लोकांनाच प्रवेश होता. माझा नंबर यायला आणि तेथील पोलिसाने प्रवेश थांबवायला एकच गाठ पडली. त्यामुळे मला इच्छा असूनही आत जाता आले नाही. एक आधुनिक तीर्थक्षेत्र पाहण्याचा योग आला नाही. त्यामुळे बाहेरूनच हात जोडून मनाचे समाधान करून घेतले.

पुढे 2014 साली धुळ्याला एक आठवडा मुक्कामाला होतो. आमचे ज्येष्ठ मित्र आत्मारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आठवडाभर कार्यक्रम आयोजित केले होते. धुळ्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांना गाणी आणि गोष्टी सांगणे हे काम माझ्यावर सोपवले होते. आत्मारामबापूंचा मुलगा चंद्रशेखर याने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रत्यक्ष स्मृतिदिनाच्या दिवशी पाच सालदारांचा सत्कार, प्रमुख पाहुण्यांचे भाषण, एका विशेषांकाचे प्रकाशन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. बापू स्वतः एका सालदाराचे पुत्र होते. तसेच आत्मारामबापू स्वतः शिक्षकही होते. पुढे त्यांनी शिक्षणसंस्था काढली. त्याच्या तीन-चार शाखा काढल्या. “दीनबंदू’ नावाचे वसतिगृह काढले. बापूंना यदुनाथ थत्ते, राजाभाऊ मंगळवेढेकर, प्रकाशभाई मोहाडीकर, मु. ब. शाह, दामोदर मुंदडा यांचा सहवास लाभला. त्यांनी साने गुरुजी कथामालेचे काम त्या परिसरात वाढवले.

धुळ्यात मुक्कामाला असताना, एकदा मनात आले, धुळ्याच्या जेलमध्ये जावे. तेथील अधिकाऱ्याला विनंती करून, विनोबांनी गीता प्रवचने सांगितली ती जागा पहावी. म्हणून एकदा जेलरोडने जात असताना धाडस करून ात निघालो. प्रवेशद्वारावर जेलपोलीस होते. त्यातील एकाला माझे म्हमणे सांगितले. मला दोन मिनिटे ती जागा पाहायचीय अशी विनंती केली. तर तो पोलीस म्हणाला, “”असे आत सोडता येत नाही. त्यासाठी वरिष्ठांची लेखी परवानगी लागते. असा रस्त्यावरचा कोणीही येईल आमि मला जेल पहाचाय, असे म्हणेल.”

जेल पोलिसाने स्पष्ट नकार दिल्यावर मी माघारी फिरलो. मनातली अतृप्त इच्छा तशीच मना राहून गेली. नंतर 10 नोव्हेंबर 2019 रोजी तो योग जुळून आला. आम्ही गोपुरी आश्रम कणकवली ते पवनार आश्रम वर्धा असी संवाद यात्रा काढली होती. कारम महात्मा गांदीजींच्या जन्माला 150 वर्षें पूर्ण झालीत. तर आचार्य विनोबा भावे व कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या जन्माला 125 वर्षे पूर्ण झालीत. म्हणून त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी संवादयात्रा काढली होती. या दौऱ्यामध्ये आम्ही 10 नोव्हेंबरला धुळ्यात होतो. तेथील कार्यक्रमाचे आयोजन साम्ययोग साधना पाक्षिकाचे संपादक रमेश दाणे व महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे सेक्रेटरी मधुकर शिरसाठ यांनी केले होते. या संवादयात्रेचा एक भाग म्हणून आम्ही धुळे जेलमध्ये जाणार होतो. तेथे कैद्यांशी संवाद साधणार होतो. तशी लेखी पूर्वपरवानगी घेऊन ठेवली होती. या यात्रेत जयवंत मठकर, आबा कांबळे, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर व मी होतो. आता मला प्रत्यक्ष जेलमध्ये जायला मिळणार होते. विनोबांनी प्रवचने दिली ती जागा पाहायला मिळणार होती.

आम्ही पत्र दाखवून, मोबाईल व इतर वस्तू त्यांच्या ताब्यात देऊन आत प्रवेश केला. मी भिरभिरत्या नजरेने परिसर पहात होतो. कार्यक3माच्या हॉलमध्ये पंधरा स्त्री कैदी व 40 पुरुष कैदी अगोदरच आणून बसवले होते. नंतर आमचा परिचय करून देण्यात आला. सत्कार करण्यात आले. संवादयात्रेचा उद्देश सांगितला. आबा कांबळे यांनी गांधीजींचे चरित्र थोडक्‍यात कथन केले. मी 1932 साली विनोबांनी सांगितलेल्या प्रवचनांचा इतिहा कथन केला. ती ही पुण्यभूमी आहे आणि इथेच गीता प्रवचनांचा जन्म झाला. गीताई या विनोबांच्या पुस्तकाचेही प्रकाशन इथेच जाले हे आवर्जून सांगितले. सर्वजण तल्लीन होऊन ऐकत होते. दोन महिला कैद्यांच्या सोबत त्यांची वर्षा-दीड वर्षांची मुलेही होती. ती आईच्या अंगाल बिलगली होती. टुकूटुकू पहात होती. आपण तुरुंगात आहोत याची त्यांना जाणीव नव्हती.

कार्यक्रमानंतर ज्या हॉलमध्ये विनोबांनी प्रवचने दिली, त्या हॉलमध्ये आम्हाला नेले. ती जागा आम्ही अनिमिष नेत्रांनी पाहिली. तेथील माती कपाळाला लावली. बऱ्याच दिवसांचे माझे स्वप्न पूर्ण झाले. तेथे उभे राहून आम्ही फोटो काढले. नंतर तेथील पोलिसाने आम्हाला साने गुरुजी कोणत्या खोलीत बंदीवान म्हमून रहात होते ती खोली दाखवली. आचार्य विनोबा आमि जमनालाल बजाज यांच्या कोठड्याही दाखविल्या. ज्या विहिरीचे पाणी जमनालालजींनी स्वतःला मोटेला जुंपून काढले ती विहीरही दाखवली. आणि पुस्तकात वाचलेला. पण आता प्रत्यक्ष पाहात असलेला 87 वर्षांपूर्वीचा तो इतिहास पुन्हा डोळ्यांपुढून सरकून गेला. अनेक दिवस धुळे जेल आतून पहायची इच्छा होती ती पूर्ण झाली. विशेषतः विनोबांनी ज्या जागेत कैद्यांसमोर प्रवचने दिली ती जागा पहायची इच्छा होती. ती अशी पूर्ण झाली. त्यासाठी वेळ यावी लागते म्हणतात. ती वेळ आज आली होती.

– डॉ. दिलीप गरूड

Leave A Reply

Your email address will not be published.