Navneet Rana : ‘ती’ अट अन् संधी हुकली! राज्यसभेची उमेदवारी मिळवण्याबाबत नवनीत राणांची सुनेत्रा पवारांसोबत नेमकी काय झाली होती चर्चा?
Navneet Rana : नवनीत राणांनी मानले सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचे आभार

Navneet Rana : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. वरिष्ठ नेतेमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. मात्र या जागेसाठी नवनीत राणा, छगन भुजबळ, अमरसिंह पंडित यांचीही नावे चर्चेत होती.
राज्यसभेच्या या जागेसाठी माजी खासदार, भाजप नेत्या नवतीन राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्यासाठी नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेशाची अट घालण्यात आली होती. नवनीत राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करुन राज्यसभेच्या उमेदवारीबाबत नेमकं काय घडलं? याची संपूर्ण माहिती दिली आहे. (Navneet Rana)
नवनीत राणांची पोस्ट- (Navneet Rana)
नवनीत राणा यांनी पोस्ट करत लिहिले की, “आधुनिक भारताची उभारणी करणारे भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब निर्भीड व कणखर गृहमंत्री मा. अमितजी शहा साहेब व महाराष्ट्राचे कार्यसम्राट व जननायक मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे काम करणारी मी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही.
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) June 9, 2026
मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिकपणे करीत राहील. (आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांना ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्या बाबत विनंती केली होती, मात्र अपरिहार्य कारणास्तव ते शक्य झाले नाही.)’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मान्य नव्हती (Navneet Rana)
‘आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती.’
त्यामुळे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरीदेखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रावहिनी व पार्थदादा पवार यांची आभारी आहे,” असे नवनीत राणा यांनी सांगितले आहे.
छगन भुजबळांची नाराजी (Navneet Rana)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी सहमत होते. पण आपण राज्यसभेवर गेल्यानंतर आपला पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं अशी भुजबळांची इच्छा होती. पण याला भाजप श्रेष्ठींकडून नकार होता, अशी चर्चा आहे. या कारणामुळे छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची संधी गमवावी लागली. याबाबत त्यांनी माध्यामांसोबत बोलताना अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली होती. Navneet Rana
हेही वाचा:





