मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यावरून त्यांच्या पक्षात (तृणमूल कॉंग्रेस) आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे आधीच ढवळून निघालेल्या बंगालमधील राजकीय वातावरण ममतांशी संबंधित घटनेमुळे आणखी तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून मोदी सरकारवर या घटनेवरून निशाणा साधत ‘ममतांना प्लॅस्टर; भाजपला दुखणं!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
काय आहे सामानाचा अग्रलेख ?
आपल्या निवडणुका आता खोटेपणा व सहानुभूती या दोन शस्त्रांनीच लढल्या जातात. प. बंगालात दोन्ही बाजूंनीच या शस्त्रांचा खणखणाट सुरू आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना हिंमत असेल तर नंदीग्राममधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान देताच ममता बॅनर्जी यांनी वाघिणीप्रमाणे भक्ष्यावर झेप घेतली व नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणुकीचा अर्ज भरला. अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार? ममतांच्या लंगडय़ा पायास भाजपवाले घाबरले ते त्यामुळेच !
नंदीग्राममध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होत असते. त्यामुळे ममतांची जखम त्यांच्या विरोधकांना जास्तच भारी पडणार आहे. ममता या नंदीग्राम येथून निवडणूक लढत आहेत. त्या नंदीग्राम येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या. त्यानंतर प्रचाराच्या दरम्यान बिरुलिया येथे मंदिरासमोर त्यांच्या गाडय़ांचा ताफा थांबला. कारच्या बाहेर उतरून त्या देवाला नमस्कार करत असताना चार-पाच लोक अचानक धावत आले आणि त्यांनी गरज नसताना दरवाजा ढकलून ममतांना जखमी केले. ममता यांच्या पायास मोठी दुखापत झाली असून त्यांचा पाय प्लॅस्टरमध्ये आहे.
हा अपघात नसून विरोधकांनी जाणूनबुजून केलेला हल्ला आहे, असे ममता म्हणत आहेत तर लोकांची सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. या अपघाताची सी.बी.आय. चौकशी करा, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केली. ममतांच्या पायाला इजा झाली हे बरोबर. त्यांच्या पायाला प्लॅस्टर पडले हेही खरेच. मात्र त्या प्लॅस्टरच्या सी.बी.आय. चौकशीची मागणी हा प. बंगाल निवडणुकीतील सगळय़ांत मोठा विनोद म्हणावा लागेल. प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला. ममतांच्या पायास पडलेले प्लॅस्टर भाजपच्या किमान दहा-वीस जागा नक्कीच जखमी करू शकते. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात सर्व शक्ती पणास लावली आहे. ममतांची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न सुरू आहे. ममतांचा पक्ष रोज फोडला जात आहे.