केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर : कुरुळीत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात
चिंबळी- आतापर्यंत पार पडलेल्या शिक्षण परिषदेतील विषयांचा उपयोग अध्ययन-अध्यापनात करुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यात मदत झाली असल्याचे कुरुळीचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांनी सांगितले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणे, खेड पंचायत समिती शिक्षणविभागा अंतर्गत कुरुळी (ता. खेड) येथे गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांच्या अध्यक्षतेखाली कुरुळी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच पार पडल्याली, त्यावेळी कुसाळकर बोलत होते.
मुख्याध्यापक अरुण गायकवाड, मुख्याध्यापिका कमल खेडकर, सुनिता तितर यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने शिक्षण परिषदेला सुरुवात झाली. हिरामण कुसाळकर यांनी केंद्रातील शाळांचा विविध उपक्रमांचा आढावा घेऊन प्रशासकीय व अध्ययन अध्यापनात ई-लर्निंग व ई-साहित्य, व्हिडिओ यांचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले. तसेच शाळा समृद्धी स्पर्धांमध्ये सहभागी फडकेवस्ती व नाणेकरवाडी शाळेस शुभेच्छा दिल्या. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, लेखन- वाचन, स्वरचिन्ह परिचय व स्वरचिन्हाचा योग्य उच्चार, वापर कसे करावे याविषयी कांचन गिलबिले व प्रवीण घोडे यांनी मार्गदर्शन केले.
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत माझा वर्ग, माझे अध्यापन यात मनोरंजनात्मक अध्यापन कसे असावे, यासाठी विविध शैक्षणिक साहित्य बनविणे, बहुउपयोगी कागदी ठोकळे बनवून अध्यापनात त्याचा वापर याविषयी सखोल मार्गदर्शन वैशाली रणपिसे व सुनिता मुंगसे यांनी केले, तर काळुराम डावरे व प्रवीण घोडे यांनी उत्कृष्ट फलकलेखन करुन दाखविले. यावेळी कुरुळी केंद्रातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांना विषयतज्ज्ञ संतोष शिंदे, सुचित्रा घुगे आदी मान्यवर उपस्थितीत होते. सूत्रसंचालन कांचन गिलबिले यांनी तर सुनिता मुंगसे यांनी आभार मानले.