मुंबई – सुशांतसिंग राजपूत या उमद्या अभिनेत्याच्या अकस्मात निधनाने हादरलेल्या बॉलीवूडला गेल्या काही महिन्यांपासून बरेच धक्के मिळत आहेत. सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूचे रहस्य अजून उलगडलेले नाही. मात्र नुकतेच एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहेत. त्यामुळे एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर सीबीआय तपासाची पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्लीच्या एम्स रुग्णालयाकडून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमचा अभ्यास पूर्ण झाला असून त्यांनी सीबीआयकडे सोपवला असल्याचं वृत्त वृत्त वाहिनीने दिलं आहे. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.
एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहेत. सोमवारी यासंबंधी सविस्तर बैठक पार पडली”. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि गेल्या ४० दिवसांत सीबीआय तपासात आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.
तत्पूर्वी, ७ वर्षांपूर्वी ‘काय पो चे’ या सुपरहिट चित्रपटातून सिल्व्हर स्क्रीनवर पदार्पण करणारा ३४ वर्षीय सुशांत १४ जूनला बांद्रा येथील आपल्या निवासस्थानी मृत अवस्थेत सापडला होता.
यानंतर सुशांतच्या वडिलांनी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बिहार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.