ती संकल्पना मानवी आयुष्याचा कालावधी निश्‍चित करण्यासारखी : मोईली

एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली

हैदराबाद – माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते एम.वीरप्पा मोईली यांनी एक देश, एक निवडणूक म्हणजेच एकत्रित निवडणुकांच्या संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. ती संकल्पना मानवी आयुष्याचा कालावधी निश्‍चित करण्यासारखी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्रितपणे व्हाव्यात, असा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, एकत्रित निवडणुका घेणे आता अव्यवहार्य बनल्याची भूमिका मोईली यांनी मांडली. विविध कारणांवरून राज्य सरकारे कोसळू शकतात.त्या राज्यांनी विधानसभा निवडणुका होण्यासाठी पुढील लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा करायची का? एकत्रित निवडणुकांचा निर्णय म्हणजे प्रत्येकाने 60 वर्षे जगावे असा कायदा बनवण्यासारखे आहे. लोकांचे निश्‍चित कालावधीपूर्वीच निधन झाले तर काय करायचे, असा सवाल त्यांनी केला. देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पं.जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात एकत्रित निवडणुकांची पद्धत अस्तित्वात आणली गेली.

मात्र, विविध कारणांवरून काही राज्य सरकारे मुदत पूर्ण करू शकली नाहीत. त्यामुळे त्या राज्यांमधील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक वेगवेगळे ठरले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

एकत्रित निवडणुका ही संकल्पना म्हणजे केवळ घोषणा आहे. बेरोजगारी, शेतीची दूरवस्था यांसारख्या खऱ्या समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेली ती धूळफेक आहे, असे टीकास्त्र मोईली यांनी सोडले. एक देश, एक निवडणूक या संकल्पनेच्या अंमलबजावणीची चाचपणी करण्यासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. कॉंग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष त्या बैठकीपासून दूर राहिले. त्यापार्श्‍वभूमीवर, मोईली यांनी त्यांची भूमिका मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.