रेडा – इंदापूर विधानसभा विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते जाती-जातीमध्ये विष पेरतील; मात्र स्वार्थी नेत्यांपासून सर्व जातीधर्माच्या जनतेने सावध राहिले पाहिजे, असे आवाहन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केले.
भांडगाव, वकीलवस्ती, सुरवड, भोडणी, शेटफळ हवेली, रेडा, खोरोची, बोराटवाडी, भगतवाडी, निरनिमगाव, सराटी,चाकाटी,टणू, गिरवी, ओझरे, गोंदी, पिंपरी बुद्रुक,गणेशवाडी, पडस्थळ गावांचा प्रचार दौरा महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि. 12) केला. या प्रचार दौऱ्यात झालेल्या सभांमध्ये हर्षवर्धन पाटील, अप्पासाहेब जगदाळे,अशोक घोगरे यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.
या दौऱ्यामध्ये भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, आरपीआय तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश देवकर व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचार दौऱ्यामध्ये पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी महायुतीचे उमेदवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच पिंपरी चिंचवड येथील योगीराज पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव तापकीर यांनीही हर्षवर्धन पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, सध्याच्या लोकप्रतिनिधीनी सर्व पदे भोगली आहेत. तरी अजूनही त्यांना पदे हवीच आहेत. मी तिकीट मागितले की त्यांना जातिवाद दिसतो, अशी टीका त्यांनी केली.