पिंपरी – मांजर हा प्राणी कितीही उंचीवरून पडला तरी तो आपल्या पायावरच उभा राहतो, हे खरे असले तरी तिसऱ्या मजल्यावरून मांजराच्या पिल्लाची सुटका करताना त्याने घेतलेली उडी आणि अग्निशामक विभागाच्या प्रशिक्षणार्थी नयन कदम यांनी घेतलेला त्याचा “कॅच’ चर्चेचा विषय ठरला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
चिंचवडगावातील एका चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका मांजराच्या पिल्लाला रविवारी (दि. 26) सुखरूप सुटका झाली. पिंपरी-चिचंवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या जवानांनी पांढऱ्या शुभ्र मांजराला जीवनदान दिले. मात्र खाली घेत असताना त्याने बकेटमधून उडी घेतली. आणि त्यावेळी खाली उभ्या असलेल्या एका प्रशिक्षणार्थीने त्या इवलुशा पिल्लाला अलगद झेलले.
चिंचवडगावातील गोखले वृंदावनच्या एच-3 या इमारतीवरील तिसऱ्या मजल्यावर खिडकीच्या सिमेंट सज्जावर मांजर अडकले असल्याची माहिती अग्निशामक विभागाला समजली. त्यानुसार लीडिंग फायरमॅन भाऊसाहेब धराडे, वाहन चालक पद्माकर बोरावके, फायरमॅन शंकर पाटील, विष्णू चव्हाण, शिवलाल, नयन कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खिडकीच्या वरील सज्ज्यावर एक मांजराचे पिल्लू अडकले होते. जवानांनी शिडीच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावरील माळ्यावर जाऊन बकेटमध्ये मांजराच्या पिल्लाला बकेटमध्ये ठेवले. बकेट खाली घेत असताना त्या पिल्ल्याने अचानक खाली उडी मारली. त्यावेळी खाली उभ्या असलेल्या अग्निशामक दलाचे प्रशिक्षणार्थी नयन कदम यांनी पिल्लाला अलगद झेलले व पुन्हा खाली सोडले.