थरूर यांचा विजय यंदा कठीण?

केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ), युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि भाजपा यांच्यादरम्यान लोकसभा निवडणुकांमधील सर्वांत अटीतटीची लढाई तिरुवनंतपूरममध्ये आहे. यूडीएएफचे नेतृत्त्व करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे डॉ. शशी थरूर हे या लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिले आहेत. तथापि, 2014 च्या मोदी लाटेदरम्यान थरूरांचे मताधिक्‍क जवळपास सात पटींनी कमी झाले होते. यंदाही तशीच काहीशी स्थिती असल्याचे मानले जात आहे. यंदा इथे भाजपा उमेदवार जिंकला तर तो या पक्षासाठी दक्षिणेतील आशेचा किरण ठरेल. दुसरीकडे सत्ताधारी एलडीएफसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे.

केरळमधील सर्वांत दक्षिणेकडील टोकावर वसलेला तिरुवनंतपूरम लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या अरबी समुद्रकिनाऱ्यापासून ते पश्‍चिम घाटातील ढलानपर्यंत पसरलेले आहे. या मतदारसंघात शहरी, ग्रामीण आणि किनाऱ्यालगतच्या क्षेत्रातील अशा 7 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये कजाखूटम, वट्टियोरोर्कावु, नेमोम, परसाला, कोवलम, नेय्यातिनकारा आणि तिरुवनंतपुरमचा समावेश आहे. या जागेवर आजपर्यंत कोणाही एका पक्षाला मक्‍तेदारी निर्माण करता आलेली नाही. या मतदारसंघातून कॉंग्रेस आणि सीपीएमचे उमेदवार अनेकदा विजयी झाले आहेत. इतिहासात डोकावल्यास आजवर अनेक दिग्गज या जागेवरून विजयी झालेले दिसून येतात. मात्र त्यांना पराभवाची चवही याच मतदारसंघाने चाखवली आहे. अपक्ष खासदार असलेल्या व्ही. के. कृष्णा मेनन यांनी डाव्यांच्या पाठिंब्यावर 1970 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला होता. 1971 मध्ये सीपीआयचे एमएन गोविंदनन नायर यांनी ही जागा जिंकली. कॉंग्रेसच्या के. करुणाकरन यांनी 1998 मध्ये याच मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक जिंकत संसदेत प्रवेश केला. केरळचे माजी मुख्यमंत्री पी. के. वासुदेवन नायर हेही 2004 मध्ये याच मतदारसंघातून विजयी झाले. दुसरीकडे गोविंदनन नायर यांना 1980 मध्ये याच मतदारसंघातून पराभवाचा दणकाही बसला. याखेरीज ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक ओएनवी कुरूप यांचाही या मतदारसंघातील मतदारांनी पराभव केलेला आहे.

आजघडीला राज्यात सीपीएमनंतर सीपीआय एलडीएफमधील दुसरा मोठा पक्ष आहे. थरूर यांची ही जागा वाचवून यूडीएफला राज्यातील राजकारणात आपले स्थान बळकट करायचे आहे. केरळमध्ये राहुल गांधींनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थरूर यांच्या जागेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. एलडीएफ हा राज्यात सत्तेत असला तरी 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये तो भाजपाहून पिछाडीवर म्हणजे तिसऱ्या स्थानावर होता.

तिरुवनंतपूरम जिल्ह्यामध्ये 66.46 टक्‍के हिंदू आहेत. तर ख्रिश्‍चन 19.1 टक्‍के आणि मुस्लीम 13.72 टक्‍के आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी शशी थरूर यांना 34.09 टक्‍के मते मिळाली होती. तर भाजपाच्या ओ राजगोपाल यांना 32.32 टक्‍के मते मिळाली होती.

यंदाच्या निवडणुकीत शशी थरूरांसमोर मिझोरामचे राज्यपालपद सोडून आलेले भाजपाचे राजशेखरन कुम्मनम यांचे आव्हान आहे. तर सीपीआयतर्फे सी. दिवाकरन हे मैदानात उतरले आहेत. मागील निवडणुकांमधील समीकरणे आणि मतदानोत्तर स्थिती पाहून राजकीय विश्‍लेषकही या जागेचे भाकीत वर्तवण्यास तयार नाहीयेत. कारण 2009 मध्ये मते 99 हजार मताधिक्‍याने जिंकणाऱ्या थरुरांना 2014 मध्ये केवळ 15 हजार मतेच जास्त मिळाली होती. संयुत राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत राहिल्यामुळे शशी थरुरांची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी प्रतिमा आहे. तसेच मोठ्या आयटी कंपन्यांना मतदारसंघात आणणे,महामार्गांचा विकास करणे यांसारखी कामे त्यांच्या खात्यावर जमा आहेत. पण मतदार राजाच्या मनात काय आहे हे सांगता येत नाहीये.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही या मतदारसंघात ताकद पणाला लावली आहे. दक्षिण भारतातील ज्या जागांवर भाजपाला विजयी होण्याच्या अपेक्षा आहेत त्यामध्ये तिरुवनंतपुरमची जागा अग्रस्थानी आहे. या मतदारसंघात भाजपाने शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा प्रचारात कळीचा ठरवला आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या संघटनेच्या बळावर राजशेखरन यांच्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

तिसरीकडे एलडीएफचे उमेदवार सी. दिवाकरन हे सीपीआयचे नेते आहेत. प्रत्यक्ष मतदारराजाच्या मनात काय आहे हे 23 मे रोजीच समजणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.