थरूर यांच्या विधानांवरून कॉंग्रेस-भाजप मध्ये जुंपली

Madhuvan

नवी दिल्ली – लाहोर थिंक फेस्टीव्हल मध्ये बोलताना कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली होती. या मुद्‌द्‌यावरून भारतीय जनता पक्षाने शशी थरूर यांनी पाकिस्तानच्या व्यासपीठावर जाऊन भारताची बदनामी केली असल्याचा आरोप केला होता. तथापि भाजपची ही नेहमीचीच जुमले बाजी असल्याचा पलटवार कॉंग्रेसने केला आहे.

शशी थरूर यांनी या थिंक फेस्टीव्हल मध्ये बोलताना मोदी सरकारला भारतातील करोनाची स्थिती हाताळण्यात मोठे अपयश आल्याची टीका केली होती, तसेच त्यांनी करोनाच्या काळात मुस्लिमांच्या विरोधात आकसाने भूमिका घेतली गेल्याचेही नमूद केले होते.

त्यावर आक्षेप घेताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्र यांनी म्हटले आहे की, शशी थरूर यांच्या सारख्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याने पाकिस्तानात भारताच्या विरोधात गरळ ओकणे हे अविश्‍वसनीय आहे. त्यांनी तेथे भारताची प्रतिमा मलीन केल्याचा आरोपही पात्रा यांनी केला.

राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यातच करोनाच्या धोक्‍याची भारत सरकारला जाणिव करून दिली होती अशी माहितीही थरूर यांनी यावेळी दिली. त्या संबंधात पात्रा म्हणाले की, राहुल गांधी यांना पाकिस्तानातून पुढची निवडणूक लढावयची आहे काय? राहुल गांधी हे पाकिस्तान आणि चीन मध्ये हिरो आहेत अशी टिप्पणीही पात्रा यांनी केली.

भाजपच्या या टीकेवर पलटवार करताना कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, भाजपची ही नेहमीचच जुमलेबाजी आहे. त्यांना मुद्दा कधीच महत्वाचा वाटत नसतो, त्यांना केवळ वायफळ बडबड करण्यातच मौज वाटते असे ते म्हणाले. अशा स्वरूपाच्या टीकेवरून भाजप नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरीच दिसून येते असे संघवी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.