थरूर यांच्या वक्तव्यावरून कॉंग्रेसमध्ये नाराजी

थिरूवनंतपूरम्‌: कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव असल्याविषयी खासदार शशी थरूर यांनी केलेल्या वक्तव्यावरून पक्षात नाराजी पसरली आहे. थरूर यांचे वक्तव्य अमान्य करणाऱ्या प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी दिल्या आहेत.

थरूर यांना वाटते त्याप्रमाणे कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव नाही. नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत पक्षाचे कामकाज पाहण्याची भूमिका राहुल गांधी यांनी राजीनामा दिला त्यावेळीच स्पष्ट केली. त्यांनी दिलेला शब्द पाळला. ते पक्षाचे दैनंदिन कामकाज पाहत आहेत, असे कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी म्हटले. कॉंग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी काहीशी आक्रमक प्रतिक्रिया दिली. त्यांनी थरूर यांना कॉंग्रेसचा इतिहास वाचण्यास सांगितले. पक्षाला नेता नसल्याचे थरूर यांचे म्हणणे अयोग्य आहे. ते तसे कसे काय म्हणू शकतात? पक्षकार्य पुढे नेण्यासाठी कॉंग्रेसकडे पुरेसे नेते आहेत, असे ते म्हणाले. केरळमधील आणखी एक नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनीही थरूर यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली.


कॉंग्रेसला ऑगस्टमध्ये मिळणार नवा अध्यक्ष?

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ऑगस्टमध्ये होईल. त्या बैठकीत नव्या अध्यक्षाबाबतचा निर्णय होईल, असे वेणुगोपाल यांनी सूचित केले. त्यामुळे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कोण, या प्रश्‍नाचे उत्तर पुढील महिन्यात मिळण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष गांधी परिवारामधीलच असणार की बाहेरचा, याविषयीही मोठी उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.