सलून व्यावसायिकांच्या संघटनेची मागणी ; मुख्य मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचे म्हणणे
हडपसर – सरकारकडून सलुन व्यवसाय (दि.28 जून पासून) सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याने या व्यावसायिकांच्या असोसिएशनकडून सरकारचे आभार मानण्यात आले असले तरी त्या-त्या शहरातील परिस्थितीनुरूप दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याने तसेच, केवळ केस कापण्यास परवानगी देण्यात आली असून दाढीसह फेशीअल अशा कामांवर बंदी ठेवण्यात आल्याने दुकाने सुरू होत असली तरी सलुन व्यवसायिकांचे नुकसानच यातून अधिक दिसते. शिवाय स्पा आणि पार्लरवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. याबाबत शासनाने सलुन व्यावसायिकांशी चर्चा करावी आणि त्यानंतर नियम ठरवावेत, असे नाभिक समाज व सलून व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील 10 लाख सलुन व्यावसायिक व त्यांचे 40 लाख लोकसंख्या असलेले कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे व्यवसाय सुरू होणे गरजेचे होते. परंतु, सलुन व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात शासनाने परवानगी दिली तरी त्यापूर्वी शिष्ट मंडळाशी चर्चा करणे गरजेचे होते.
याबाबत अध्यक्ष काशिद यांनी सांगितले की, अन्य व्यवसाय नियमांतर्गत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असताना त्याच पार्श्वभुमीवर सलुन व्यवसायालाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे सातत्याने करीत होतो. शासनाकडून परवानगी दिली गेली असली तरी याबाबतचे नियम पाहता व्यावसायात अडचणीत कायमच राहणार आहेत. मानसिक तणावातून पाच कारागिरांनी आत्महत्या केल्या आहेत, ही बाबही सरकारने लक्षात घ्यायला हवी, असेही अध्यक्ष काशिद यांनी स्पष्ट केले.
आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबांना मदत द्या…
राज्यभरात पाच सलुन व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. आजपर्यंत सरकारकडून कोणतीही अर्थिक मदत मिळालेली नाही, त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची अर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, प्रत्येक दुकानदारास एक लाख रुपये मदत द्यावी, 6 महिन्यांचे दुकान भाडे व वीजबिल माफ करावे, 50 लाखांचे विमा संरक्षण मिळावे, अशाही मागण्या असोसिएशनकडून सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत.