तेलाच्या करारासाठी ट्रम्प यांच्याकडून पुतीन यांना धन्यवाद

वॉशिंग्टन : जागतिक बाजारातील तेलाच्या व्यापारासंदर्भात करण्यात आलेल्या कराराबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आणि सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान अल सौद यांना धन्यवाद दिले आहेत. व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांशी फोनवर चर्चा केली. जागतिक ऊर्जा आणि वित्तीय बाजार स्थिरतेशी सुसंगत पातळीवर तेलाचे उत्पादन परत आणण्याच्या रशिया आणि सौदी अरेबियाच्या भूमिकेचे ट्रम्प यांनी स्वागत केले. एकमेकांबरोबर आणि अन्य तेल उत्पादक देशांबरोबर मिळून काम करून जागतिक उर्जा बाजारातील अनिश्‍चितता दूर केल्याबद्दल ट्रम्प यांनी दोघांनाही धन्यवाद दिले.

रविवारी तेल उत्पादक देशांनी किंमती वाढण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करण्याचे मान्य केले होते. नवीन करोना विषाणूचे संकट आणि रशिया-सौदीदरम्यानच्या किंमतीच्या युद्धामुळे तेलाच्या किंमती खाली आल्या होत्या. मात्र तेल उत्पादक देशांमधील करार सर्वांसाठी फायद्याचा असल्याचे ट्‌विट ट्रम्प यांनी केले आहे. या करारामुळे अमेरिकेतील तेल उत्पादन क्षेत्रातील हजारो जणांना बेरोजगार होण्यापासून वाचवले गेले आहे. त्याबद्दल आपण रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आणि सौदीचे युवराज महंमद बिन सलमान अल सौद यांना धन्यवाद देत आहे, असे ट्रम्प यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.