करोनाच्या साथीमुळे शेकडो शहरांमधील कारभार ठप्प पडला आहे. अशावेळी नागरिकांच्या सोयी सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी काही यंत्रणा अव्याहतपणे काम करत आहेत. अशा सर्व व्यक्ती-संस्थांबाबत कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन अमेरिकेची प्रख्यात गायिका- गीतकार ब्रिटनी स्पीअर्सने या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.
तिने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहीली आहे. किराणा मालाच्या दुकानातील क्लार्क, मेडिकल दुकानदार, रेस्टॉरंट कामगार, ट्रक ड्रायव्हर, स्वच्छता कर्मचारी, शेतकरी, गोदामांमध्ये काम करणारे कामगर अशा सर्वांना आपण मनापासून धन्यवाद देऊ इच्छित असल्याचे ब्रिटनीने तिच्या पोस्टमध्ये लिहीले आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनीने तिचा 38 वा वाढदिवस बॉयफ्रेंड सॅम असघारीबरोबर साजरा केला. ब्रिटनी 38 वर्षांची तर सॅम केवळ 25 वर्षांचा आहे.
वाढदिवसाच्या पार्टीचे व्हिडीओ तिने शेअर केले होते. सॅमबरोबर मियामीमधील हॉटेलमध्ये तिने एक घरगुती पार्टी ठेवली होती. इथेच या दोघांनी आईस स्केटिंगचाही आनंद घेतला होता. ही पार्टी झाली, तेंव्हा जगभर करोनाचा एवढा प्रादुर्भाव झाला नव्हता. आता मात्र ब्रिटनीने सर्व प्रकारच्या एकत्रीकरणांपासून दूर राहण्याचे ठरवले आहे.