ठाणे : ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बाळकूम नाका येथे असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान दरोडेखोरांनी दरोड्यादरम्यान अंदाधुंद गोळीबारदेखील केला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ निर्माण झाली.
काय घडले नेमके?
चार चोरटे दागिन्यांच्या दुकानात घुसून दरोडा टाकतात, त्यापैकी एकाने दुकानदाराला पकडून धमकावण्याचा प्रयत्न केला. या चारही दरोडेखोरांनी बंदुकीच्या जोरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानदाराच्या तत्परतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. या घटनेत एका दरोडेखोराला पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित 3 आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.
ही संपूर्ण दरोड्याची घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर बाळकुम ब्लॉक येथील व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा उपायांवर चर्चा करण्यासाठी पोलिसांनी स्थानिक व्यापारी संघटनांची भेट घेतली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.