बरेली – अक्षय कुमार याच्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटामध्ये आपण सीबीआय अथवा इनकम टॅक्स ऑफिसर असल्याचं भासवून लूट करणाऱ्या टोळीचं कथानक पडद्यावर पाहिलं होतं. मात्र आता उत्तरप्रदेशातील पिलिभीत जिल्ह्यामध्ये अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली असून चोरटयांनी चक्क क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचं भासवत ठाणे अंमलदार घर लुटलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, ठाणे अंमलदार पुष्कर सिंग यांच्या शास्त्री नगर येथील निवासस्थानी मंगळवार सायंकाळी ६ भामट्यांनी क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचं भासवत घरामध्ये प्रवेश मिळवला. मात्र घरामध्ये प्रवेश करताच त्यांनी घरामध्ये उपस्थित असलेल्या सिंग यांच्या पत्नी, मुलगी व एका भाडेकऱ्यास बंदुकीचा धाक दाखवून घरातील मौल्यवान ऐवज व रोख रक्कम लुटली.
दरम्यान, आरोपींना जेरबंद करण्यासाठी अमरिया पोलिसांनी एक विशेष तुकडी स्थापन केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु असल्याची माहिती बरेलीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेंद्र पांडे यांनी दिली.