शिरूरच्या पूर्व भागात ‘चिकनगुनिया’चे थैमान; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन, ‘ही’ आहेत मुख्य लक्षणे

- दिवसात एका गावात सापडतात 10 ते 20 रुग्ण ः नागरिक त्रस्त

मांडवगण फराटा – सर्व सांधे लॉक, आपले हात, पाय व गुडघ्यांवर सूज येवून आपण जर पांगळे झालो असेल तर ही चिकनगुनियाची मुख्य लक्षणे आहेत. याच लक्षणांच्या आजाराने शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा, सादलगाव, वडगाव रासाई या गावात सध्या या आजारांनी थैमान घातले आहे.

गावातील प्रत्येक घरात एक तरी रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. दिवसात एका गावात सरासरी रोज 10 ते 20 रुग्ण आढळून येत आहेत. आत्तापर्यंत हजारो जणांना याची बाधा झाली आहे. या आजाराला सामोरे जाताना रुग्णांना खासगी दवाखान्याचा रस्ता धरण्याची वेळ आली आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून या परिसरात चिकनगुणिया व डेग्यूचे रूग्ण आढळत आहेत. नागरिकांनी आवश्‍यक ती काळजी न घेतल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामपंचायतींनी ठिकठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मांडवगण फराटा, वडगाव रासाई ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गावात एकदा फवारणी करण्यात आल्याची माहीती येथील सरपंच शिवाजी कदम व सचिन शेलार यांनी दिली आहे.

नागरिकांनी घरातील पाणीसाठे तपासून ते कोरडे केले पाहिजेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे. 30 टक्‍के जबाबदारी आमची तर 70 टक्‍के जबाबदारी नागरिकांची आहे. त्यासाठी नागरिकांनी तुंबलेली गटारे मोकळी करून द्यावी. फुटक्‍या बदल्या, टायर यामध्ये साचलेले पाणी मोकळे करावे. घरातील पाणीसाठे नष्ट करावेत आणि आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे केल्यास ही साथ आटोक्‍यात येईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

“नागरिक वेगवेगळ्या ठिकठिकाणी जात उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या सांगता येत नाही. परंतु जवळच्या दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहीती जमा करण्यात येत आहे. नागरिकांच्या घरामध्येच अळ्यांची पैदास होत असून, घरात तयार झालेल्या डासांची अंडी घातल्यानंतर आठ दिवसांत पुन्हा नव्या डासांची निर्मिती होत असल्यामुळेच घरात रुग्णांची संख्या वाढत आहे.”
– डॉ. मंजुषा सातपुते, वैद्यकीय अधिकारी मांडवगण फराटा

“मांडवगण फराटा गावातील मुख्य चौकात एकदा फवारणी झाली आहे. वाड्यावस्त्यांवर फवारणी सुरू आहे. रुग्ण असलेल्या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.”
– शिवाजी कदम, सरपंच मांडवगण फराटा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.