मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कारण जगात कोरोनाचे जवळपास 17 लाख 80 हजार रुग्ण झाले आहेत. जगभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 1 लाख 8 हजारांवर (10771) गेली आहे. तर चार लाख 3 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजून जवळपास 12 लाख 68 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 50 हजार 590 गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. अमेरिकेत 20 हजार बळींचा आकडा ओलांडला गेला आहे. गेल्या 24 तासात 1830 बळी अमेरिकेत गेले आहे. आता अमेरिकेत एकूण बळींची संख्या 20 हजार 577 वर पोहोचली आहे तर रुग्णांची संख्या पाच लाख 33 हजारांवर गेली आहे.
न्यूयॉर्क प्रांतात काल 783 बळी, तिथे रुग्णांची संख्या 1 लाख 81 हजार तर एकूण मृतांचा आकडा 8627 इतका आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 2183, मिशिगनमध्ये 1392, लुझियाना 806, इलिनॉईस 677, कॅलिफोर्निया 630 आणि वॉशिंग्टनमध्ये 494 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे. गेल्या 11 दिवसात अमेरिकेने तब्बल 15 हजार 492 लोक गमावले.