‘ठाकुर सज्जन सिंह’ फेम ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन; बॉलीवूडसह टीव्ही जगत हळहळले

मुंबई : बॉलीवूड आणि टीव्ही जगतासाठी आणखी एक दुःखद  बातमी समोर आली आहे. अनेक चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अनुपम श्याम यांचे  निधन झाले आहे. मागील बऱ्याच काळापासून ते आजारी होते. रविवारी सांयकाळी त्यांचे निधन झालं.

मन या लोकप्रिय मालिकेला त्यांनी दिलेला आवाज आणि प्रतिज्ञा या मालिकेमधील ठाकुर सज्जन सिंह या दोन गोष्टींमुळे अनुपम यांनी घराघरात ओळख निर्माण केली होती.  मागील काही दिवसांपासून अनुपम यांच्या प्रकृतीसंदर्भातील बातम्यांमुळे ते चर्चे होते. त्यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी अनुपम यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केले होता. मात्र उपचारांनंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आजारी असतानाच अनुपम हे स्टार भारतच्या प्रतिज्ञा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाच्या चित्रकरणामध्ये सहभागी झाले होते. मुंबईमधील लाइफ लाइन रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांची प्रकृती फारच खालावली आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचा मृत्यू झाला. दिग्दर्शक अर्जुन पंडित आणि अभिनेता मनोज जोशी यांनी अनुपम यांना सोशल नेटवर्किंगवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अनुपम यांनी दस्तक, हजार चौरासी की मां, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, संघर्ष, लगान, नायक, शक्ति, पाप, जिज्ञासा, राज, वेलडन, अब्बा, वॉन्टेड, कजरारे और मुन्ना माइकल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘प्रतिज्ञा’ या मालिकेमुळे अनुपम घराघरात पोहचले. या मालिकेत त्यांनी ‘ठाकुर सज्जन सिंह’ ही भूमिका साकारली होती. या भूमिकेचा एवढा प्रभाव मालिकांवर पडला की नंतर अशी भूमिका अनेक मालिकांमध्ये दिसून आली. अनुपम यांच्या निधनानंतर सोशल नेटवर्किंगबरोबरच मनोरंजन क्षेत्रामध्येही शोक व्यक्त केला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.