पुणे: एनइसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत भारताच्या स्नेहल माने, निदित्रा राजमोहन यांचे आव्हान संपुष्टात आले. तर, थायलंडच्या नुदनिदा लुआंगनामाने सनसनाटी विजय मिळवला.
या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या कॅटी बौलटर हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या स्नेहल मानेचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
कॅटीने स्नेहलचे आव्हान अवघ्या 44 मिनिटांत संपुष्टात आणले. इटलीच्या मार्टिना केरगारोने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या निदित्रा राजमोहनचा 6-0, 6-2 असा पराभव करून तिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. थायलंडच्या नुदनिदा लुआंगनाम हिने चीनच्या लू जिया-जिंगचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(10) असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या इटलीच्या कोरिना डेंटोनीने रशियाच्या व्हॅलेरिया सवायींखचा 4-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्सने रशियाच्या डारीया मिशीनाचा 6-3, 7-5 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. क्वालिफायर जपानच्या सातो नाहो हिने कडवी झुंज देत रशियाच्या अमिना अंशबाचे आव्हान 6-4, 3-6, 6-4 असे संपुष्टात आणले. दुहेरीत पहिल्या फेरीत नॉर्वेच्या उलरीके एकेरी व रशियाच्या याशीना एकतेरिना यांनी भारताच्या श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती व परीन शिवेकर या जोडीचा 6-1 6-2 असा पराभव केला.