#ThailandOpen : भारताच्या प्रणोयची विजयी सलामी

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

बॅंकॉक  – भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणोय याने थायलंड ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने स्पर्धेत विजयी सलामी देताना पहिल्या फेरीच्या सामन्यात जागतिक सातव्या मानांकित जोनाथन ख्रिस्टिनचा 18-21, 21-16, 23-21 असा तीन गेममध्ये पराभव केला. या प्रकारच्या स्पर्धेत प्रणोयचा हा पहिलाच विजय ठरला आहे. त्याला गेल्या चारही स्पर्धांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला होता.

ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू व किदम्बी श्रीकांत यांनीही स्पर्धेत विजयी सलामी दिली. तर, समीर वर्माने जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावरील ली झी जियाला पराभवाचा धक्‍का दिला.
गेल्या आठवड्यात आशियाई टप्प्याच्या पहिल्या स्पर्धेत डेन्मार्कच्या मिया ब्लिशफिल्डने पहिल्याच फेरीत जगज्जेत्या सिंधूला पराभवाचा धक्‍का दिला होता.

या स्पर्धेत मात्र सिंधूने जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावरील थायलंडच्या बुसानन ओंगबामरूनंगफानला 21-17, 21-13 असे पराभूत केले. ऑलिम्पिक पदकविजेत्या सायना नेहवालचे मात्र पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. रॅटचानोक इन्थॅनॉन हिने तिचा 21-17, 21-8 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत श्रीकांतने थायलंडच्या सिथिकोम थामासिनला 21-11, 21-11 असे 37 मिनिटांत पराभूत केले.

समीरने आठव्या मानांकित ली याचा 18-21, 27-25, 21-19 असा पराभव केला. पी. कश्‍यपने डेन्मार्कच्या रॅसमूस गेम्केविरुद्धची लढत 0-3 अशी पिछाडीवर असताना दुखापतीमुळे सोडली. आता पुरुष एकेरीत श्रीकांतवरच भारताची प्रामुख्याने मदार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.