करोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे थायलंडमधील तुरुंगात दंगल 

बॅंकॉक – तुरुंगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या भीतीमुळे थायलंडमधील एका तुरुंगात कैद्यांमध्ये दंगल झाली आणि या दंगलीमाध्ये कैद्यांनी तुरुंगातील फर्निचरची तोडफोड केली. तसेच तुरुंगाच्या खिडक्‍यांची तावदानेही फोडून टाकली. रविवारी सकाळी थायलंडच्या ईशान्येकडील बुरिराम तुरुंगात हा प्रकार घडला. या तुरुंगात सुमारे 2 हजार कैदी आहेत, असे न्याय मंत्रालयाने सांगितले. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

या दंगलीची काही दृश्‍ये स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दाखवली. त्यामध्ये तुरुंगाच्या आवारातून मोठ्या प्रमाणावर काळा धूर येऊ लागल्याचे दिसत आहे.
“तुरुंगातील कैद्यांचा एक गट पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता आणि गोंधळ निर्माण करीत होता. त्या कैद्यांनी काही फर्निचरची जाळपोळ केली.’ असे सुधार विभागाचे महासंचालक नारात सावताना म्हणाले.

तुरूंगात “कोविड-19’चा उद्रेक झाल्याबद्दल काही अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर अस्वस्थ झालेल्या कैद्यांशी बोलण्यासाठी मानसिक आरोग्य कर्मचारी तैनात केले आहेत, असे मेजर जनरल अक्करादेज पिमोनसरी यांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले.

थायलंडमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेले 1,388 रुग्ण उघड झाले आहेत. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील किमान दोन कैद्यांना कोविड-19 ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तुरुंगामध्ये करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तुरुंगामध्ये अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध घातले गेले आहेत. तसेच अलिकडच्या काळात तुरुंगात आणल्या गेलेल्या नव्या कैद्यांना 14 दिवस विलगीकरणात ठेवले जात आहे.

करोनाच्या भीतीमुळे गेल्या रविवारी कोलंबियाची राजधानी बोगोटा इथल्या तुरुंगातही दंगल घडली आणि त्यात 23 कैदी ठार झाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.