थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : नेहवाल व कश्‍यप यांची विजयी सलामी

बॅंकॉक – ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही.च्या अनुस्थितीत भारताचे महिला गटात आव्हान राखणाऱ्या साईना नेहवालने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत शानदार सलामी केली. पारुपल्ली कश्‍यप व एच.एस.प्रणोय यांनीही विजयी प्रारंभ केला. मात्र, त्यांचा सहकारी सौरभ वर्माचे आव्हान संपुष्टात आले. सिंधूने या स्पर्धेतून आकस्मिक माघार घेतली आहे. नेहवालने थायलंडच्या फितायापोर्नी चायवानचा 21-17, 21-19 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिने ड्रॉपशॉट्‌सचा सुरेख खेळ केला. तिने इंडोनेशिया व जपान खुल्या स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली होती. येथे तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

महिलांच्या एकेरीत पात्रता फेरीद्वारे मुख्य फेरी गाठणाऱ्या साई उत्तेजिताला पहिल्याच फेरीत हार मानावी लागली. तिला चीनच्या चेन झियाओकडून 17-21, 7-21 अशी हार पत्करावी लागली. पुरूषांच्या एकेरीत कश्‍यपने इस्त्रायलच्या मिशा झिलबर्मनचा 18-21, 21-18, 21-14 असा पराभव केला. पहिली गेम गमाविल्यानंतर त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्‍यांचा कल्पकतेने उपयोग केला आणि उर्वरित दोन्ही गेम्स घेतल्या, प्रणोयने हॉंगकॉंगच्या वोंग विंगझिल्बर्मनचा 21-16, 22-20 असा पराभव केला. वर्मा याला जपानच्या कानता त्सुनेयामाने 23-21, 19-21, 21-15 असे पराभूत केले. दुसरी गेम घेत त्याने सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, तिसऱ्या गेममध्ये त्याला सर्व्हिस व स्मॅशिंगवर नियंत्रण ठेवता आले नाही.

मिश्रदुहेरीत भारतीय जोड्यांनी शानदार विजयी वाटचाल केली. सात्विकसाईराज रान्किरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा यांनी चान पेंग सुआन व गोह लिऊ यिंग यांचा 21-18, 18-21, 21-17 असा पराभव केला. प्रणव जेरी चोप्रा व एन,सिक्की रेड्डी यांनीही आव्हान राखले. त्यांनी जपानच्या कोहेई गोन्दो व आयेनी कुरीहारा यांचे आव्हान 21-16, 21-13 असे संपुष्टात आणले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)