Thackeray Group | Konkan – विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना पक्षातील खदखद सातत्याने समोर येत आहे. ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आपली नाराजी थेट उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली होती.
दुसरीकडे पक्षातील कारभारावरून आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजन साळवी हे भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेच्या मार्गावर आहेत, असे सांगितले जाते.
दुसरीकडे भास्कर जाधव यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. यामुळे आगामी काळात कोकणात ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचा दावा शिंदेसेनेच्या नेत्याने केला आहे.
याबाबत मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. पुढील आठ दिवसांत ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता आम्ही खरे शिवसैनिक वाटू लागले आहोत, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
पक्षफुटीनंतर भास्कर जाधव आणि राजन साळवी दोन्ही नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर गद्दार म्हणून हल्लाबोल केला होता. यातच सामंत यांनी लगावलेला टोला आणि केलेल्या दाव्यामुळे भास्कर जाधव की राजन साळवे हा बडा नेता कोण, अशी चर्चा रंगली आहे.
उदय सामंत म्हणाले, 18 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जात आहेत. मी 19 तारखेला दावोसला जात आहे. मी 24 तारखेला परत येत आहे. 24 तारखेपर्यंत आपण वाट पाहावी.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठा नेत्याचा पक्षप्रवेश पुढील आठ दिवसांत आमच्या पक्षात होणार आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता आम्ही खरे शिवसैनिक वाटू लागले आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेस झालेली दिसेल.