नगर – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये लांगूलचाल, तुष्टीकरणासह हिरवेकरणाची स्पर्धाच लागली होती. ठाकरे यांनीही भगवा सोडून हिरवा झेंडा हाती घेतला होता. त्याच्याच दुष्परिणामातून “लव्ह जिहाद’ सारख्या घटना राज्यात घडत आहेत. “द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे हिंदू समाज जागृत होऊन आता तक्रारी करण्यासाठी पुढे येऊ लागला आहे.
त्यातूनच हिंदू आक्रोश मोर्चे निघू लागले आहेत, असा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नगरमध्ये बोलताना केला. जिल्ह्यातील “लव्ह जिहाद’ सारख्या घटनांसंदर्भात सोमय्या यांनी बुधवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची जिल्ह्यातील सात पीडित कुटुंबीयांसह भेट घेतली. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थित होते.
त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या सात घटनातील काही आरोपी पकडले गेले आहेत तर काही आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पथके नियुक्त केले जातील, असे आश्वासन पोलिसांनी दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले. फुस लावून पळवून नेलेल्या, अपहरण झालेल्या घटनातील मुली 13-14 ते 22 वयोगटातील आहेत. पोलिसांनी या प्रकरणात संवेदनशीलता दाखवावी, महिला व बालकल्याण विभागाने त्यांच्या कल्याणाच्या, प्रबोधनाच्या व पुनर्वसनाच्या योजना राबवाव्यात, अशीही मागणी प्रशासनाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“लव्ह जिहाद’मुळे समाजापुढे नवे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे या घटनांकडे पक्षीय दृष्टिकोनातून न पाहता सर्वांनी पुढे यावे, आपणही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन सर्व राज्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावी अशी मागणी करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.