मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीन पदाधिकाऱ्यांना पदावरून डच्चू देण्यात आला आहे. यातील काहींनी पक्षाविरोधात भूमिका घेतली असल्याचे दिसून आले तर काही जण बंडखोरीच्या तयारीत आहेत.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख शंकर हिरामण मांडेकर आणि महाड-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे या तिघांची पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून किशनचंद तनवणाी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, तनवाणी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किशनचंद तनवाणी यांना जिल्हा प्रमुख पदावरुन कार्यमुक्त केले.
पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ही कारवाई केली असून त्यांच्या जागी आता शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले.