ठाकरेंनी मित्रपक्षाशी संवाद ठेवावा

शरद पवार यांच्या शिवसेनेला कानपिचक्‍या

मुंबई – राज्यात आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त त्यांनी मित्रपक्षांशी संवाद ठेवावा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाला कानपिचक्‍या दिल्या. उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा वेगळी आहे. त्याचं कारण उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत शिवसेनेची आहे. शिवसेनेत आदेशाने काम करण्याची पद्धत आहे, हे मी सेनेच्या स्थापनेपासून पाहतोय, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार संजय राऊत यांना दिलेल्या “एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा आज ते बोलत होते. पवार म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आम्ही ज्या विचाराने वाढलोय, आम्ही वरिष्ठांच्या मतांचा आदर करतो, पण वरिष्ठांकडून आदेश येतोच असं नाही आणि समजा एखादे मत मांडले, तर त्यावर आम्ही चर्चा करु शकतो, ही आमच्या कार्यकारिणीची पद्धत आहे.

शिवसेनेमध्ये नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची ही पद्धत आहे. या विचाराने तो पक्ष चालला आणि यशस्वीसुद्धा झाला. सध्याचे मुख्यमंत्री त्याच पठडीतले आहेत आणि माझी काहीच तक्रार नाही, असे पवारांनी सांगितले.

आम्हाला अजिबात कोणतीही अडचण नाही. मात्र सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची ही पद्धत नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकट्याचं नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांमध्ये दोघांची काही मतं असतील, तर ती जाणून घेण्याची आवश्‍यकता आहे, असे पवार म्हणाले.

आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो, की आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चा सुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही, फक्त डायलॉग दिसत नाही, असे म्हणत पवारांनी ठाकरेंकडून संवादाची अपेक्षा व्यक्त केली.

फडणवीसांच्या गौप्यस्फोटात तथ्य नाही
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटात काहीच तथ्य नाही. फडणवीसांना भाजपच्या निर्णयप्रक्रियेत किती स्थान? असा सवाल पवारांनी विचारला. भाजप नेते म्हणायचे शिवसेनेसोबत सरकार बनवायचे नाही. स्थिर सरकारसाठी साथ द्या म्हणून भाजप नेते येत होते. तीन वेळा पाठिंबा मागण्यासाठी भाजप नेते आले होते. मोदींना भेटून मी सांगितले, भाजपसोबत येणार नाही. शिवसेनेबरोबर सरकार बनवू वा विरोधात बसू असे सांगितले. मोदींना भेटल्या भेटल्या मी संजय राऊतांना तपशील दिले, असेही पवार यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.