मुंबई – शिंदे गटाच्या “महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्यात जात आहे. अशात राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. यावर आता ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून या संपूर्ण वादावर भाष्य करण्यात आलं
काय आहे सामनाचा अग्रलेख
डबक्यातला बेडूक हा पावसाळ्यापुरताच असतो. पाऊस गेला, डबकी सुकली की, बेडूकही नष्ट होतील. मग हत्तीची कानदुखी बरी होईल. बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये. पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर असतो. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात ‘हत्ती विरुद्ध बेडूक’ अशी विचित्र झुंज सुरू झाली आहे. बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद असल्याने हत्ती थोडा चिंतेत आहे इतकेच!
महाराष्ट्रातील मुडदूस सरकारचे भवितव्य काय हे कोणीच सांगू शकणार नाही. गेले चारेक दिवस दोन्ही बाजूच्या शेंदाड शिपायांनी एकमेकांवर यथेच्छ शेणफेक केल्यावर भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकतर्फी जाहीर केले की, ‘‘भाजप व बनावट शिवसेनेत काही मतभेद होते, पण आता ते राहिलेले नाहीत.’’ बावनकुळे हे नेहमीप्रमाणेच अंधारात चाचपडत आहेत. आमच्यात काही मतभेद नाहीत, असे बावनकुळे सांगतात. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य प्रवक्ते व शेणफेक विभागाचे प्रमुख खासदार अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, ‘‘मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक म्हणजे बेडूक आहेत. बेडूक कितीही फुगला तरी त्यास हत्ती होता येणार नाही!’’ बोंडे यांची शाळा घेणे गरजेचे आहे. वाक:प्रचार म्हण अशी आहे की, बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही. पण मालकांना बैल कसे म्हणावे? म्हणून बैलाच्या जागी हत्ती आणला व त्यात काही चुकीचे नाही.
म्हणजे श्री. फडणवीस हे वैभवशाली हत्ती तर मुख्यमंत्री शिंदे हे डबक्यातले बेडूक आहेत. फडणवीस यांच्या प्रवक्त्याने शिंदे यांना बेडूक वगैरे म्हटले तरी बेडकांची चाळीस पिले तोंडातून अक्षर काढायला तयार नाहीत. सगळे कसे चिडीचूप. खा. बोंडे असेही म्हणाले की, ‘‘शिंदे यांची उडी ठाण्याच्या पलीकडे नाही. त्यांना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटतो काय?’’ बोंडे यांच्या मुखातून फडणवीस बोलत आहेत हे नक्की. शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांत दिलेल्या जाहिरातींचे हे असे पडसाद महाराष्ट्रात उमटले.
फडणवीस यांच्यापेक्षा आपणच महाराष्ट्रात लोकप्रिय असून जनतेचा कौल आपल्यालाच आहे असा ‘टेंभा’ मिरवणारी मुख्यमंत्री शिंदे यांची एक जाहिरात प्रसिद्ध होताच गोंधळ उडाला व भाजपच्या लोकांनी शिंद्यांच्या गटाला बेडूक वगैरे म्हणेपर्यंत मजल गेली. तरीही भाजपचे बावनखणी बावनकुळे म्हणतात, ‘‘सर्वकाही ठीक आहे.’’ एखाद्या औषधाचे जसे साईड इफेक्ट होतात तसे साईड इफेक्ट या जाहिरातीचे झाले. एकतर भाजपास अचानक लुळेपांगळे झाल्यासारखे वाटले आणि श्री. फडणवीस यांची प्रकृती बिघडली. मुख्यमंत्र्यांबरोबरचा त्यांचा
कोल्हापूर दौरा
त्यांनी रद्द केला. श्री. फडणवीस यांचा कान दुखत आहे, असे कारण देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबरचे पुढील दोन-तीन दिवसांचे सर्वच कार्यक्रम रद्द करून फडणवीस हे शांत बसले. शिंदे-मिंधे गटाकडून तर एरवी चालणाऱ्या सर्वच जिभा जणू पांगळ्या पडल्या. वादग्रस्त जाहिरातीवर फुंकर मारणारी दुसरी नवी जाहिरात शिंदे गटाने देऊनही भाजपची कानदुखी बरी व्हायला तयार नाही. कानाचे दुखणे मनापर्यंत गेले की काय? यावर पुन्हा बावनकुळे मखलाशी करतात, ‘‘जाहिरातीची चूक सुधारली आहे. दुखावलेली मने बरी झाली आहेत.’’ श्रीमान बावनकुळे, सर्वकाही बरे झाले असेल तर श्री. फडणवीस यांची कानदुखी का बरी होत नाही? बुधवारी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर फडणवीस यांचे नाव असले तरी फडणवीस यांच्या कार्यक्रमांमध्ये या वर्धापन दिन कार्यक्रमाचा कुठेही उल्लेख नव्हता. गुरुवारी पालघर येथील एका सरकारी कार्यक्रमातही ‘कानदुखी पार्ट – 2’चा भाग पाहायला मिळाला.
पालघर येथे पोहोचल्यावर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना आपल्या गाडीत बसण्याचा मुख्यमंत्र्यांचा आग्रह फडणवीस यांनी धुडकावून लावला. कधीकाळी याच मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे चालक बनलेले फडणवीस अशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. पालघरमध्ये मात्र ते स्वतंत्र गाडीतून गेले. याचा अर्थ काय? ‘कानदुखी ते गाडीदुखी’ असा हा प्रवास आहे आणि भाजप-मिंधे सरकारची गाडी रुळावरून घसरत आहे, असाच त्याचा अर्थ आहे. पुन्हा या घसरणीला ‘निमित्त’ ठरलेल्या जाहिरातीची चूक साधारण 10-15 कोटीला व चुकीची दुरुस्ती तेवढय़ाच कोटीला पडली. म्हणजे फडणवीसांची कानदुखी 20-25 कोटीला पडली. जाहिरात दुरुस्त झाली, पण फडणवीसांचा कान दुरुस्त होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. श्रीमान बावनकुळे हे अंधारात चाचपडत आहेत, असे आम्ही म्हणतो ते यासाठीच. फडणवीस यांनी कच खाऊन राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले म्हणून शिंदे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाहीत. शिंदे व त्यांचा गट हा फडणवीसांचा
मांडलिक आहे
व मांडलिकच राहणार. शिंदे गटाचे ज्येष्ठ पुढारी गजानन कीर्तिकर यांनी त्यांच्या आमदार-खासदारांच्या बैठकीत आव्हानाची भाषा केली. आम्ही चाळीस फुटलो म्हणून महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली हे त्यांनी विसरू नये व त्यानंतर लगेच फडणवीस यांना खाली पाडणारी भव्य जाहिरात प्रसिद्ध केली. एका अज्ञात हितचिंतकाने म्हणे ही जाहिरात प्रसिद्ध केली व त्याची आम्हाला माहिती नाही, असा खुलासा मिंधे गटाच्या शंभू देसाई या मंत्र्याने केला. 20-25 कोटी रुपये खर्च करणारा हा अज्ञात हितचिंतक कोण? त्याने इतका खर्च का केला ते महाराष्ट्राच्या जनतेला कळायलाच हवे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने अज्ञात हितचिंतकाचा हा काळा व्यवहार त्वरित शोधून काढावा व त्याची खबर गृहमंत्र्यांना द्यावी. कारण त्यांच्या कानाचा व भाजपच्या दुखावलेल्या मनाचा प्रश्न आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांचे बेताल चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने उघडपणे दावा ठोकला. एवढेच नव्हे तर ‘‘कल्याण काय, ठाणेही आमचेच,’’ असेही भाजपवाल्यांनी ‘च’वर जोर देत उघड उघड सांगितले.
म्हणजे बावनकुळे म्हणतात त्याप्रमाणे भाजप-मिंधे गटात अगोदरचे काही मतभेद होते, त्यात या नवीन मतभेदांची भर पडली. फुटीर गटाच्या मंत्र्यांची लाचखोरीची प्रकरणे पुराव्यासह बाहेर पडत आहेत. आता मिंधे गटाच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यासह बाहेर कोण देत आहे? ते सारा महाराष्ट्र जाणतो. कानामागून आलेल्यांना तिखट होऊ देणार नाही हाच त्यामागचा संदेश आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किमान चार-पाच फुटीर मंत्री फासावर जातील व फासाचा खटका दाबण्याची वेळ मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरच आणली जाईल अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. डबक्यातला बेडूक हा पावसाळ्यापुरताच असतो. पाऊस गेला, डबकी सुकली की, बेडूकही नष्ट होतील. मग हत्तीची कानदुखी बरी होईल. बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये. पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर असतो. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात ‘हत्ती विरुद्ध बेडूक’ अशी विचित्र झुंज सुरू झाली आहे. बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद असल्याने हत्ती थोडा चिंतेत आहे इतकेच!