सातारा : जनतेच्या प्रश्नांना शिवसैनिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जनतेच्या जवळ जाण्यासाठी शिवसेना उबाठा गट जिल्हयातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहवे, असे आवाहन शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.
सातारा येथे हॉटेल द फर्न या ठिकाणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण मोठ्या ताकदीने व निष्ठेने काम सुरू करून आपला दबदबा निर्माण करा. असे आवाहन त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना केले. मागचे काय झाले याचा विचार न करता तळागाळात जाऊन गोरगरीब जनतेसाठी काम करा, राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील सर्व समस्या सोडवा, वेळप्रसंगी आंदोलन व मोर्चे काढून जनतेचा प्रश्नांना हात घाला, अशी सूचना त्यांनी केली.
आपल्याला गाव तिथे शाखा उभारून घराघरांत शिवसैनिक तयार करून उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिवसैनिकांना ताकद देणार व स्थानिक स्वराज्य सस्थांमध्ये भगवा फडकवणार, असा दाव जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी केला. शिवसेना उपनेत्या श्रीमती छायाताई शिंदे, कराड उत्तरचे उप जिल्हाप्रमुख सुनील पाटील, जिल्हा महिला आघाडी अनिताताई जाधव, तालुका संघटक सतीश पाटील, उपजिल्हा संघटक किरण भोसले, तालुका प्रमुख संजय भोसले व विशाल कुंभार, पदाधिकारी उपस्थित होते.