हिंगोली – राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजिनामा घेऊन त्यांची चौकशी करावी तसेच चौकशीपूर्ण होई पर्यंत त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवावे अशी मागणी हिंगोली जिल्हयातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनाद्वारे गुरुवारी केली आहे.
या संदर्भात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर , ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, बाळासाहेब मगर, रेणुका पतंगे, दिनकरराव देशमुख, उध्दवराव गायकवाड, गणेश शिंदे, वसीम देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविले आहे.
या सोबतच राज्यात वाळू उपसा व वाहतूकीचे धोरण बदलावे तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू द्यावी, नाफेडची सोयाबीन खरेदी बंद करू नये, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पिकविमा धोरणामध्ये सुधारणा करावी, पुरग्रस्त व अतिवृष्टीचे पैसे तातडीने अदा करावेत अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.