ठाकरे सरकारचं पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींचे पॅकेज

मुंबई – राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने 11 हजार 500 कोटी रुपये इतक्‍या तरतुदीस मान्यता दिली असून, यामधून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाईल. 

आपत्तीग्रस्त नागरिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येईल. या निधीपैकी मदतीसाठी एक हजार 500 कोटी रुपये, पुनर्बांधणीसाठी तीन हजार कोटी व बाधित क्षेत्रात सौम्यीकरण उपाययोजनांसाठी सात हजार कोटी रूपयांच्या खर्चास देण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकमध्या याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

कुटुबांना कपडे तसेच घरगुती भांडी, वस्तू यांचे नुकसानीकरिता 48 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडले असण्याची अट शिथिल करुन प्रतिकुटुंब 5 हजार रुपये, कपड्यांचे नुकसानीकरिता आणि घरगुती भांडी, वस्तू यांच्या नुकसानीकरिता 5 हजार रुपये प्रतिकुटुंब देण्यात येईल.

पशुधन नुकसानीसाठी दुधाळ जनावरांसाठी 40 हजार रुपये प्रतिजनावर, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 30हजार रूपये प्रति जनावर, ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांसाठी 20 हजार रुपये प्रति जनावर, मेंढी, बकरी, डुक्कर यासारख्या जनावरांसाठी चार हजार प्रती जनावर तसेच कुक्कुटपालन पक्षांसाठी प्रतिपक्षी 50 रुपये याप्रमाणे आणि प्रतिकुटुंबास जास्तीत जास्त पाच हजार रुपये याप्रमाणे मदत देण्यात येईल.

पूर्णत: नष्ट झालेल्या पक्‍क्‍या, कच्च्या घरांसाठी दीड लाख रुपये प्रति घर. अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी 50हजार रुपये प्रति घर मदत दिली जाईल. किमान 25 टक्के पडझड झालेल्या घरांसाठी 25 हजार रुपये, तर किमान 15 टक्‍के पडझड झालेल्या घरांसाठी रु 15 हजार रुपये, नष्ट झालेल्या झोपडयांसाठी रु 15 हजार रुपये मदत दिली जाईल. शहरी भागात मात्र ही मदत घोषित केलेल्या झोपडपट्टीपट्टयातील पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपडयांसाठी देय राहील.

मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी अंशत: बोटीचे नुकसान झाले असल्यास 10 हजार रुपये, बोटींचे पूर्णत: नुकसान झाले असल्यास 25 हजार रुपये. अंशत: नुकसान झालेल्या जाळ्यांसाठी पाच हजार रुपये, जाळ्यांचे पूर्णत: नुकसान झाले असल्यास पाच हजार रुपये मदत देण्यात येईल.
हस्तकला, कारागिरांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली. हस्तकला व हातमाग कारागीर यामध्ये बारा बलुतेदार, मूर्तीकार इत्यादी यांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली.

दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली. टपरीधारकांपैकी अधिकृत टपरीधारकांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली. कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी पाच हजार रुपये इतकी मदत देण्यास मान्यता देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.