मुंबई – करोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ठाकरे सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असून अनेकविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार 5 सप्टेंबर रोजी “माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे.
या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शंका तसेच घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे.
या परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.
परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. राहूल पंडित, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत.