मुंबई – कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण वाचवले पाहिजे. याबाबत राज्य सरकारने अधिक सजग होण्याची जास्त आवश्यकता आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षण हा राजकारणापलीकडचा विषय आहे. आम्ही ज्यावेळेस मराठा आरक्षणाचे बिल आणले, त्यानंतर केस झाली. आम्ही सर्वपक्षीय लोकांना एकत्रित करून, सर्वांना माहिती देऊन मराठा आरक्षणासाठी काम केले, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. ही केस आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. या केसकडे सरकारचं लक्ष असणं आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टात बुद्धीचा खेळ चालतो. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी काही मुद्दे उपस्थित केले तर त्यावर राज्य सरकारच्या बाजूने लगेच उत्तर देता यायला हवं. त्यासाठी राज्य सरकारने या केसकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र, राज्य सरकारकडून सातत्याने लक्ष देण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला.
सीनियर काउन्सिल जे असतात त्यांना सर्व माहिती नसते. त्यांच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचलेली नसते. ते ऐनवेळी चार गोष्टी विचारतात. त्या चार गोष्टी ऐनवेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात. त्यासाठी टीम तयार करावी लागते. मराठा आरक्षणाचा खटला तमिळनाडूसोबत टॅप झाला पाहिजे. तमिळनाडूचा जसा प्रश्न सुटला, त्याचमार्गाने प्रश्न सोडण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला पाहिजे. सरकारने सीनियर काउन्सिल जे सांगतील त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.