ग्रंथ हे माणसाला आकार देण्याचे काम करतात : भारत सासणे

पुस्तकांच्या गावात 600 तासांचा वाचन यज्ञ
 भिलार : ग्रंथ हे माणसाला आकार देण्याचे काम करतात. पुस्तकांतूनच माणसातील संवेदनशीलता विकसित होते. वाचनामुळे जगण्याला अर्थ प्राप्त होतो. वाचनामुळे आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा नेमका शोध घेऊ शकतो. म्हणूनच आपण कायम वाचत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन विख्यात साहित्यिक भारत सासणे यांनी केले.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्‍टोबर हा जन्मदिन देशभर “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यानिमित्त 12 व 13 ऑक्‍टोबर रोजी पुस्तकांचं गाव भिलार येथे वाचनध्यास हा सलग वाचनाचा उपक्रम पार पडला. त्या उपक्रमाच्या समारोपावेळी सासणे बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून सहभागी वाचकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

वाचनाचा ध्यास घेतलेल्या एकूण 53 वाचकांनी, 16 साहित्यप्रकारांच्या पुस्तकघरांमध्ये प्रत्येकी सुमारे 600 तास वाचनाचा आनंद घेतला. वाचनध्यास या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. राज्यातील नऊ जिल्ह्यांमधून आलेल्या सहभागी वाचकांमध्ये अभियंते, प्रकाशक, शिक्षक, लेखक, सेवानिवृत्त अधिकारी, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांचा समावेश होता. चिंचवड येथील पुनरुत्थान गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांनीही चरित्र-आत्मचरित्र व इतिहास या दालनांत पुस्तक वाचनाचा अनुभव घेतला. तसेच भिलार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 42 विद्यार्थ्यांनी बालसाहित्याच्या दालनात सलग पाच तास वाचन केले.

समारोपाच्या सत्रात निवडक वाचक सहभागींनी आपले मनोगतही व्यक्त केले. गावातील निसर्गसौंदर्य आणि नीरव शांततेचाही अनेकांनी आवर्जून उल्लेख केला. एकाच साहित्य दालनामध्ये आणि एकाच परिसरामध्ये एवढी प्रचंड साहित्य संपत्ती उपलब्ध असल्याने आम्ही भारावून गेलो आहोत, असा अभिप्राय सहभागींनी नोंदवला. याप्रसंगी “पुनरूत्थान गुरुकुलम’चे संस्थापक व लेखक गिरीश प्रभुणे, ग्रंथसखा वाचनालयाचे प्रमुख श्‍यामसुंदर जोशी यांच्यासह भिलार गावातील प्रवीण भिलारे, शशिकांत भिलारे, प्रशांत भिलारे आणि सरपंच श्रीमती वंदनाताई भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.