तालमींकडे पाठ; तरुणाई जीमकडे

शहराचे कुस्ती वैभव हरपले ः तालमींना वाचविण्यासाठी पैलवान मंडळींची धडपड

पिंपरी – शहरातील तरुणाईमध्ये फिटनेसचे वाढते फॅड आहे. मात्र, त्यासाठी जीमचा पर्याय निवडला जात आहे. परिणामी शहरातील तालमी ओस पडू लागल्या असून तालमींना वाचविण्यासाठी पैलवान मंडळींची धडपड सुरू आहे. तालमींकडे पाठ; तरुणाई जीमकडे शहराचे कुस्ती वैभव हरपले ः तालमींना वाचविण्यासाठी पैलवान मंडळींची धडपड

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, चिखली, मोशी, चिंचवड, थेरगाव, पुनावळे, वाकड या भागात तालमी आहेत. पूर्वी या तालमींमध्ये पैलवानांचा राबता असायचा. कुस्तीपट्टू, कबड्डीपट्टू याठिकाणी सरावासाठी यायचे. पहाटे मोकळ्या हवेत धावल्यानंतर तालमीत जोर, बैठका, डंबेल्स मारणे, मान मजबूत करण्यासाठी गळ्यात जात्याची अवजड तळी अडकवून फिरणे, लालमातीच्या हौद्यात जड फावड्याने माती ओढणे अशी मेहनत केली जात असे. बदाम, काजू, दूध, अंडी यांचा खुराक असायचा. दुपारनंतर आखाड्यात कुस्ती खेळायची. कस वाढविणे, डाव प्रतीडावांचा अभ्यास करणे, जोर बैठकांच्या सहाय्याने शरीर पिळदार बनवायचे फडातून कुस्त्या खेळून बक्षीस मिळवायचे, असा दिनक्रम ठरलेला असायचा. मात्र, वाढते शहरीकरण तसेच काळानुरूप शरीर कमविण्यापेक्षा करिअरला जास्त महत्त्व आले आहे.

कामाच्या वेळा सांभाळून तालीम करणे आजच्या तरुणाईला अवघड जात आहे. त्यामुळे दिवसभरात कोणत्याही वेळेत जीम गाठून व्यायाम केला जातो. सिक्‍स पॅक्‍स, एट पॅक्‍सच्या आकर्षणामुळे तालमींऐवजी जीमला प्राधान्य दिले जात आहे. कुस्तीची मैदाने येथील भूमिपुत्रांनी अनेक वर्षे गाजविली. मात्र, आता बोटावर मोजण्याइतकेच पैलवान तयार होत आहेत. तेल लावून लाल मातीत पकडी करण्यात अख्खा दिवस घालविणारे पैलवान आता दिसेनासे झाले आहेत. एकीकडे तालमींमध्ये तुरळक गर्दी दिसत असताना दुसरीकडे जीममध्ये पाय ठेवायला जागा नसल्याचे सकाळी व सायंकाळी पहायला मिळते. महिलांसाठीही राखीव वेळ ठेवली जात आहे. पैलवानांचे गाव असलेल्या भोसरीमध्ये पैलवानांअभावी एक तालीम बंद पडली आहे. तर उर्वरीत तालीम रडतखडत सुरू आहेत. चिखलीमध्ये दोन तालमी आहेत. त्यापैकी एकाच तालमीत गर्दी असते. वस्ताद मंडळींची तालीम वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.

महापालिकेने तालमी वाचविण्याची गरज महापालिका हद्दीतील समाविष्ट भागामध्ये एका गावात किमान दोन तालमी आहे. भोसरी सारख्या भागात नऊ तालमी आहेत. त्यातील एक बंद पडली आहे. तालीम ही महाराष्ट्राचे क्रीडा वैभवच आहे. जीममध्ये जावून कृत्रिम शरीर कमविण्याच्या मागे आजची तरुणाई आहे. मात्र, तालमीमध्ये खऱ्या अर्थाने भरीव शरीरयष्टी बनते. अनेक तालमींमध्ये सोयी सुविधा नाहीत. त्याचाही परिणाम तालमींकडे पाठ फिरविण्याकडे होत आहे. महापालिका क्रीडा विभागावर वर्षाकाठी कोट्यावधी रुपये खर्च करते. व्यायामशाळांचा खर्च महापालिका उचलते. मात्र, जुन्या तालमींकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. पैलवान मंडळींमुळे तालमी टिकून आहेत. महापालिकेने तालमी वाचविणे गरजेचे आहे. महापालिकेकडे याबाबत अनेकदा निवेदने दिली. मात्र, क्रीडा विभाग गांभिर्याने घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.

तालमींमध्ये तयार होणारी शरीरयष्टी चिरस्थायी असते. नोकरी, धंद्याला प्राधान्य द्यावे लागत असल्याने तालमींकडे कल कमी होत चालला आहे. सिक्‍स पॅक्‍स, एट पॅक्‍सच्या आकर्षणामुळे तालीम घटली आहे. काही तालमींमध्ये युवक केवळ व्यायामाला येतात. जीममध्ये तयार होणारी शरीरयष्टी ही कायमस्वरुपी टिकत नाही. याठिकाणी “सप्लिमेंट’ दिले जाते. त्याचा कालांतराने शरीरावर विपरित परिणाम होत असतो. तालमींना गतवैभव मिळवून देणे गरजेचे आहे.

– राहुल चंद्रकांत लांडगे, पैलवान, भोसरी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.