पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 10 ऑक्टोबर 2021 रोजी होत आहे. त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्व परीक्षा होत आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्याचे उमेदवारांची गैरसोय होत आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात निवेदन पुण्यातील दत्तात्रय फडतरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आणि परीक्षेच्या वेळापत्रक बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेला आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी 2021 मध्ये टीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. त्यानंतर राज्य शासनाने मान्यता दिल्याने ही परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले.
यूपीएससी परीक्षाही नियोजित वेळापत्रकानुसार 27 जून 2021 रोजी होणार होती. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर ही पूर्व परीक्षा ढकलण्यात आली. त्यानंतर यूपीएससीने जून महिन्यातच दि. 10 ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा असल्याचे घोषित केले आहे. राज्यातून सात ते दहा लाखापर्यंत उमेदवार ह्या परीक्षा देत असतात. शिक्षण विभागाने याबाबत कोणताही विचार न करता, त्याच दिवशी टीईटी होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे.
परीक्षा परिषदेचा नियोजनशून्य कारभार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी टीईटीच्या तारखा 29 जुलै रोजी प्रसिद्ध केली. त्या पूर्वीच यूपीएससीने पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. परिषदेने परीक्षेचे नियोजन न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्य परीक्षा परिषदेला टीईटी परीक्षेची तारीख बदलावी लागेल. अन्यथा उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.